Breaking News

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या शहरातच मुलीचा दुर्दैवी मृत्यूः अजित पवारांनी धरले धारेवर व्हेंटीलेटरअभावी अंबूबॅग दाबून वीस तास कृत्रीम श्वासोच्छवास देणाऱ्या आई-वडीलांसमोरच मुलीचा मृत्यू होणे ही दुर्दैवी आणि लाजिरवाणी बाब

राजकारणातील सध्या हुकमी एक्का असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या नागपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने सतरा वर्षांच्या तरुणीला आई-वडीलांसमोर प्राण सोडावे लागल्याची घटना दुर्दैवी, सरकारसाठी लाजिरवाणी बाब आहे. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेसे व्हेंटीलेटर उपलब्ध करण्यात यावेत, ते चालू राहतील याची दक्षता घेण्यात यावी. रुग्णालयांमध्ये औषधे व इतर सामुग्री उपलब्ध ठेवावी. डॉक्टर व इतर कर्मचारी वर्ग पुरेसा ठेवावा. नवीन रुग्णालय किंवा वैद्यकीय महाविद्यालय सुरु करताना आधीच्या रुग्णालयातील स्टाफची पळवापळवी करु नये. डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची भरती तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केली.

महाराष्ट्राच्या उपराजधानीत, नागपूर वैद्यकीय महाविद्यालयासारख्या आशियातल्या दुसऱ्या सर्वात मोठ्या रुग्णालयात एका तरुणीला व्हेंटीलेटर उपलब्ध होऊ शकला नाही. तिचे आई-वडिल अंबूबॅगचा फुगा दाबून तब्बल वीस तास तिला कृत्रीम श्वासोच्छवास देत होते. तरीही त्या तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. नागपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयासह इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात वर्षभरात बाह्य व आंतररुग्ण मिळून दहा लाखापेक्षा जास्त रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. त्यामुळे या रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी अधिकचे लक्ष देण्याची गरज असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

महाविद्यालयाचे रुग्णालय व इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ही दोन्ही रुग्णालये गोरगरीब जनतेचा आधार आहेत. दोन्ही रुग्णालयात खाटा समान असतानाही मेयोमध्ये मेडिकलच्या तुलनेत अर्धाच कर्मचारी वर्ग येथे कार्यरत आहे. तसेय या रुग्णालयात वारंवार औषधांचा तुटवडा असतो. या समस्या अत्यंत गंभीर आहेत. राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयाची स्थिती सुधारण्यावर तातडीने लक्ष देण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

दरम्यान वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे तसेच व्हेंटीलेटरअभावी होणारे मृत्यू टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *