Breaking News

अजित दादांच्या त्या टीकेवर गुलाबराव पाटील यांचा पलटवार, सकाळी शपथ तर संध्याकाळी कोणा… शेवटी जनता हुशार

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणाला उधाण आलं आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्यातच पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ आणि चिंचवड जागेसाठी पोटनिवडणूक जाहिर झालेली असून या निवडणूकीचा प्रचार संपताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांबाबत भविष्यवाणी करत उध्दव ठाकरे यांना सोडून बाहेर पडलेला एकही नेता पुन्हा निवडूण येणार नाही अशी टीका केली. त्यावर शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी अजित पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना पहाटेच्या शपथविधीवरून पलटवार केला.

अजित पवार यांच्या टीकेनंतर शिंदे गटाचे आमदार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर देताना म्हणाले, सकाळी कुणाबरोबर तरी शपथ घेतात, संध्याकाळी कुणाबरोबर जातात, अशांनी आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही, असा टोला गुलाबराव पाटलांनी लगावला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अजित पवारांच्या टीकेबाबत विचारलं असता गुलाबराव पाटील म्हणाले की, शेवटी जनता हुशार आहे. अजित पवारांनी जे वक्तव्य केलं आहे, ते कितपत लागू होतं, हे त्यांनीच तपासून बघावं. हे सकाळी कुणाबरोबर शपथ घेतात आणि संध्याकाळी कुणाबरोबर जातात. तिसऱ्या दिवशी कुणाबरोबर सरकारमध्ये बसतात. अशांनी आम्हाला या गोष्टी सांगण्याची गरज नाही, असा उपरोधिक टोला ही लगावला.

तसेच एका जाहिर सभेत गुलाबराव पाटील यांनी आम्हाला मराठ्याचा मुख्यमंत्री करायचा होता म्हणून एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीला साथ दिल्याचा दावा करत आपल्या बंडखोरीचे समर्थन केले.

दरम्यान, पुण्यातील प्रचारा दरम्यान अजित पवार यांनी जे आमदार उद्धव ठाकरे यांना सोडून बाहेर पडले आहेत. त्यातील एकही आमदार निवडून येत नाही. नारायण राणेंनी शिवसेना फोडली होती. सगळे बाहेर पडले. त्यानंतर राणेसाहेब तर दोनदा पडले. एकदा कोकणात आणि एकदा मुंबईत पडले. मुंबईत तर त्यांना एका महिलेनं पाडलं. एका बाईनं पाडलं नारायण राणेंना, अशी खोचक टोलेबाजी केल्याचा अजित पवारांच्या भाषणाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *