Breaking News

प्रकाश आंबेडकरांचे मोठे वक्तव्य, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत जर… शिवसेना संपविल्याचा आनंद अमित शाह यांच्या चेहऱ्यावर दिसतोय

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आगामी २०२४ ची लोकसभा निवडणूक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राजकीय भविष्य यावर मोठं विधान केलं आहे. मुस्लीम समुदायाने साथ दिली, तर २०२४ मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ शकणार नाही, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते मुंबईत मुस्लीम मौलवी आणि उलमा यांच्याबरोबरच्या बैठकीत बोलत होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, मुस्लीम समुदायाने साथ दिली, तर २०२४ मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ शकणार नाही. तुम्ही हे लिहून ठेवा. ही मुस्लिमांची ताकद आहे. यावेळी बदलाची लाट मुस्लिमांमधून येईल. २०२४ मध्ये मुस्लिम समाज कोणत्याही परिस्थितीत भाजपाला मतदान करणार नाही हा सर्वांना विश्वास आहे.

देशात धार्मिक तेढ वाढवणारी तसेच सामाजिक शांतता भंग करणारी परिस्थिती निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर मुस्लीम मौलवी आणि उलमा यांच्याबरोबर महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ‘मुस्लीम समाजाची सध्याच्या राजकीय व्यवस्थेतील पिळवणूक, मूलभूत समस्या आणि संवैधानिक उपाय’ या अनुषंगाने उपस्थितांशी संवाद साधला. तसेच पैगंबर बिल संदर्भातही चर्चा झाली, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करत दिली.

यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले, मोदी आणि शहांचे राजकारण हे द्वेषाचे राजकारण आहे. राज्यातून शिवसेना संपवली यांचा आनंद अमित शहा यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. आसुरी आनंद व्यक्त करताना उद्धवचा वध केला आणि आपला अजून एक शत्रू आहे तो म्हणजे वंचित, म्हणून ते आमच्याही मागे लागण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, असे अनेक आले आणि गेले. आम्ही अहो तिथेच आहोत. त्यामुळे आमच्या नादी लागू नका, असा इशाराही अमित शाह यांना दिला.

अखिल भारतीय भिख्खू संघाच्या वतीने राजगाव येथे धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड. बाळासाहेब आंबेडकर बोलत होते. यावेळी डॉ. सिद्धार्थ देवळे, गजला खान, धवसे, किरण गिऱ्हे हुले यांच्यासह वंचितचे पदाधिकारी, भिख्खू उपस्थित होते. ॲड. आंबेडकर म्हणाले की, काँग्रेसच्या काळात निवडणुकीत थोडी दयामाया होती. पण आत्ताचे भाजपा सरकार लोकांना विकत घेण्याची भाषा वापरते. हे सरकार व्यापाऱ्यांचे, दलालांचे सरकार आहे. हल्ली धर्माचे राजकारण होत आहे. धर्माचे राजकारण करणारे सत्तेत आले. परंतु, पोटाचा प्रश्न सुटलेला नाही. मोदी- शहा खुनशी हव्यासापोटी दबावतंत्र वापरून विरोधकांना संपवत आहेत. बेरोजगारी, शेती, अशा अनेक विषयावर आंबेडकर यांनी सडकून टीका केली.

एकनाथ शिंदे आणि भाजपवाले मतदारांना पैशाच्या जोरावर विकत घेण्याची भाषा वापरत आहेत. त्यामुळे मतदारांनी प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये ठराव घेऊन भाजपा व त्यांच्या सहकाऱ्यांना एका मताला पन्नास हजार रुपये द्या, अन्यथा चालते व्हा, असा बोर्ड लावण्याचाही आंबेडकरांनी सल्ला दिला.

फडणवीस एकेकांना फटाके लावत आहेत. त्यांच्या तोंडचा मुख्यमंत्री पदाचा घास हिरावला म्हणून ते संतप्त राहतात. म्हणून फक्त त्यांच्या सभेत मुख्यमंत्री कोण, अशा घोषणा देऊन बघा, असेही आंबेडकर म्हणाले.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *