Breaking News

बच्चू कडू यांनी दिली रवी राणा यांना १ नोव्हेंबरपर्यतची मुदत

एकनाथ शिंदे समर्थक प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू आणि भाजपा समर्थक आमदार रवी राणा यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. बच्चू कडू यांनी आज रवी राणा यांना आव्हान देत केलेल्या १ नोव्हेंबर पर्यत केलेल्या आरोपानुसार पुरावे द्या अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा असा इशारा दिला. त्यामुळे आगामी काळात बच्चू कडू विरूध्द रवी राणा हा राजकिय सामना अमरावती जिल्ह्यात चांगलाच रंगणार असल्याचे दिसून येत आहे.   काही दिवसांपूर्वी रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केले होते. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता. या आरोपानंतर बच्चू कडू आक्रमक झाले.

याप्रकरणी बच्चू कडू यांनी थेट राजापेठ पोलिस ठाण्यात रवी राणाविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच रवी राणा यांनी केलेले आरोप सिद्ध झाले तर त्यांच्या घरी जाऊन भांडी घासेन, १ तारखेपर्यंत आरोप सिद्ध करावा, अन्यथा आपण कठोर कायदेशीर पावलं उचलणार असल्याचे संकेतही बच्चू कडू यांनी दिले.

संबंधित प्रकरणावर भाष्य करताना रवी राणांचा एकेरी उल्लेख करत बच्चू कडू म्हणाले, रवी राणाने जे काही आरोप केले आहेत ते त्याने सिद्ध करावे. माझ्यावरील आरोप सिद्ध करण्यासाठी रवी राणाला १ नोव्हेंबरपर्यंतचा वेळ देतो. एक तारखेला मी अमरावतीतील टाऊन हॉलमध्ये येतो. तिथे त्याने आपले पुरावे सादर करावेत. त्याने केलेले आरोप सिद्ध झाले तर मी त्याच्या घरी भांडी घासेन.

रवी राणा हा सत्तेत येऊन दुधही चाटतो आणि आमच्यावर आरोपही करतो. आरपारची लढाई करायची असेल, तर मी त्याला तयार आहे. तो जिथे बोलवेल तिथे जाण्यास तयार आहे, अशी आक्रमक भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला. मात्र, आपण या अधिकाराचं पतन करत पुन्हा किराणा देणाऱ्याला निवडून देतो, अशी टीकाही त्यांनी यावेळई केली.

यावेळी बच्चू कडू म्हणाले, काही ठिकाणी मतं मिळवायची असतील तर राजकीय नेत्याला रक्ताची आहुती द्यावी लागते. मी रक्तदान करून निवडणुकीचा अर्ज भरला होता. राजकीय मंडळींनी दान करण्याची प्रवृत्ती ठेवणं महत्त्वाचं आहे. नाहीतर येथे आधी खिशे कापणारे मग किराणा वाटणारे महाठग, महाअवलादी कमी आहेत का? असा सवालही त्यांनी केला.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *