Breaking News

सुप्रिया सुळे यांचे आश्वासन,… सरसकट कर्जमाफी होईल भाजपाचं हे सरकार नसून दडपशाही

शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. दुध उत्पादक शेतकऱ्यांची तिच परिस्थिती आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व्हावी यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले. आज या मोर्चाचा तिसरा दिवस असून या मोर्चाने बारामती मतदार संघातील दौड येथून मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सहभाग नोंदवला. यावेळी शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं काम केंद्र सरकारने आणि ट्रिपल इंजिन सरकारने केले आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या मागण्यांकरिता आक्रोश मोर्चा सुरू आहे. मोर्चाचा आजचा तिसरा दिवस आहे. हा मोर्चा आमच्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे. शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नावर मी अनेक वेळा केंद्रीय मंत्री यांना ट्विटर द्वारे यासंदर्भातील जाणीव करून दिली होती. मात्र तरी देखील या सरकारने कुठलेही ठोस निर्णय न घेतल्यामुळे आज कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे अशी टीकाही केली.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भात वारंवार केंद्रीय मंत्री यांना सांगितले होते संसदेमध्ये या संदर्भात प्रश्न देखील उपस्थित केला होता मात्र त्यावेळी माझ्यावर भ्रष्ट जुमले पार्टीच्या वतीने टीका करण्यात येत होती मात्र आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याला एक रुपया भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून कांद्याचे उभे पीक जाळण्यात येत आहे देशातील आणि राज्यातील सरकार हे शेतकरी विरोधातील आहे. सरकारच्या शेतकरी धोरणांमध्ये गोंधळ. आमचे सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी करणार असे सांगितले.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, दिल्लीचे भाजपचा हे सरकार नसून ती दडपशाही आहे. सरकारला लोकशाही नको आहे म्हणून निवडणुका घेतल्या जात नाहीयेत. दीड वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका घेण्यात आलेल्या नाही आहे, असा आरोपही केला.

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सर्वसामान्य मायबाप जनतेत फिरलं, तर तुम्हाला कळेलचं की, आज जनता आणि शेतकऱ्यांचं कंबरडे मोडण्याच पाप हे केंद्र सरकारने आणि ट्रिपल इंजिनच्या सरकारने केलेले आहे. आज शेतकऱ्यांच्या पिकांना कवडीमोल भाव मिळत आहे. कांदा निर्यातबंदी करून शेतकऱ्यांच्या तोंडचा घास सरकारने काढून घेतला. भाजपा सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांनी शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं असल्याची व्यथाही मांडली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, वैयक्तिक कुणाचा विरोध नसतो. हा विरोध चुकीच्या धोरणांचा आहे. वैयक्तिक कोणाशी नाही. आमची लढाई भाजपच्या शेतकरी विरोधी नीतीच्या विरोधात आहे. भाजपा हा शेतकऱ्यांच्या आणि महिल्यांच्या विरोधात आहे. सर्वसामान्य गोरगरीब वंचित आणि कष्टकरी यांच्या विरोधात हे ट्रिपल इंजिन खोके सरकार आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जेव्हा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होतात, तेव्हाच राज्यातील क्राईम का वाढतो. ? यापूर्वी ५ वर्षे जे देवेंद्र फडणवीस होते ते आता राहिले नाहीत. भाजपा फडणवीसांवर अन्याय करत आहे. दिल्लीतील नेत्यांकडून फडणवीसांचा अपमान केला जातो. एखादा नेता कष्ट करत असेल तर त्याचा मान सन्मान करायला नको का? एका मराठी माणसाचा अपमान दिल्लीचा दरबार करतो याची मला अस्वस्थता होते. तसेच भाजपा हा महिलांविरोधी पक्ष आहे असा आरोपही केला.

मनोज जरांगेंचं २० जानेवारीपासून मुंबईत उपोषण सुरू होत आहे. आपण आरक्षण घेतल्याशिवाय, माघारी फिरणार नाही, असं जरांगेंनी स्पष्ट केलं. त्याविषयी विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, २० जानेवारीपर्यंत जरांगे यांनी सरकारला मुदत दिली आहे. अजून तीन आठवडे बाकी आहेत. बघू काय होतंय ते, राज्यातील सरकारकडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. राज्यातील सरकार केवळ पक्ष फोडा, घर फोडा या कामात व्यस्त आहे. तर शेतकऱ्यांसाठी न्याय मागितला तर केंद्र सरकारकडून निलंबन केले जाते. हे सरकार नव्हे तर दडपशाही आहे अशी टीका केली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्यातील सर्व निर्णय हे दिल्लीतूनच घेतले जातात. आम्हाला जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे. त्यामुळे आम्ही लोकांचे प्रश्नच संसदेत मांडतो. मी असो किंवा खासदार अमोल कोल्हे असोत, आम्ही काल्पनिक गोष्टी लोकसभेत बोलत नाही. काल्पनिक गोष्टी सत्तेतील असलेले लोक बोलत असतात अशी टीका केली.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *