Breaking News

अबु आझमी म्हणाले, राज ठाकरेंमध्ये अयोध्येला जाण्याची हिम्मत नाही राज ठाकरेंच्या सभेनंतर उठविली टीकेची झोड

अयोध्येचा दौरा तुर्तास स्थगित केल्यानंतर आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पुणे येथील गणेश कला क्रिडा मंच येथे आज सभा आयोजित केली होती. त्यात राज ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा रद्द करण्यामागेची दोन कारणे सांगितली असून त्यातील एक कारण हे स्वत:च्या पाठीच्या दुखण्याचे तर दुसरे कारण म्हणजे उत्तर प्रदेशात मनसेला अडकविण्यासाठी सापळा रचण्यात आल्याचा आरोप करत त्यामुळे आपण दौरा रद्दबातल केल्याचे कारण राज ठाकरे यांनी दिले. यापार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबु आझमी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे.

यावेळी पिंपरी-चिंचवड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अबु आझमी म्हणाले की, राज ठाकरे यांच्यात अयोध्येला जाण्याची हिम्मत नाही ते घाबरले आहेत. आता तब्येतीचे कारण देत आहेत अशी खोचक टीका करत हे त्यांचे बहाणे असून त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, माफ केलं तरच त्यांनी अयोध्येला जावं असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

बिचारे राज ठाकरे खूप अडचणीत आहेत. त्यांचं राजकारण संपलंय. त्यांना विचारणारे कोणी नाही. मी जेव्हा शपथ घ्यायला गेलो तेव्हा स्पीकर साहेबांना विचारलं होतं की शपथ कुठल्या भाषेत घेऊ. त्यांनी सांगितलं होतं भारतातील कुठल्याही भाषेत शपथ घेऊ शकता. मात्र, मनसेने मराठी, हिंदीवरून किती मोठा गोंधळ केला हे सर्वांनी पाहिलं आहे. उत्तर भारतीयांना त्यांनी मारहाण केली हे सर्व त्यांनी मराठी नागरिक त्यांना साथ देतील म्हणून केलं. परंतु, मराठी बांधवांनी त्यांना साथ दिली नसल्याचे ते म्हणाले.

अयोध्याला कसे जाणार त्यांच्यात हिंमत नाही. राज ठाकरे यांनी जे केलं आहे ते भरावं लागेल. ज्या उत्तर प्रदेशात राम भगवान, श्रीकृष्ण यांचा जन्म झाला त्याच उत्तर भारतीयांना सन्मान द्यायला हवा होता. राज ठाकरे यांचे बहाणे आहेत. त्यांच्यात हिंमत नाही, ते घाबरले आहेत. भाजपाचा खासदार म्हणतोय त्यांना येऊ देणार नाही, हे सर्व मिली जुली आहे. उत्तर भारतीयांची त्यांनी माफी मागावी, माफ केले तरच त्यांनी अयोध्येला जावं असा उपरोधिक सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

सन्मानासाठी उत्तर भारतीय जीव देतील. राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलला आहे म्हणून त्यांना महाविकास आघाडी अटक करत नाही. त्यांना वाटतं तसं केल्यास मतदान जाईल असे सांगत ते पुढे म्हणाले, बाबरी मस्जिद प्रकरणी आम्ही गुपचूप निकाल मान्य केला. आता ज्ञानव्यापी मस्जिद प्रकरण पुढे आणलं जात आहे. देशात हाच विषय आहे का? भारत नरसंहाराच्या दिशेने जात आहे. याबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितलं आहे, पण यावर कारवाई होत नाही. महाराष्ट्रात सर्वात मोठा हिंदुत्ववादी कोण आहे हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपाचा देखील तोच प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

आम्ही बाबरी मस्जिद तोडली अशी चढाओढ त्यांच्यात लागली आहे. हे सगळं मतदानासाठी सुरू आहे. आमचा शिवसेनेला पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे हे म्हणाले होते की ३० वर्ष झालं युतीत सडलो. आता तुम्ही त्यांची साथ सोडली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत आलात, आमच्यासोबत सेक्युलरकडे जाणार होतात तर एक विचारायचं आहे की, सगळ्यात मोठे हिंदुत्ववादी होऊन भाजपासोबत का लढत आहात? सेक्युलरिझमचा प्रचार का करत नाही? असा सवालही त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना केला.

Check Also

निवडणूक आयोगाची नरेंद्र मोदींच्या विरोधातील तक्रारीबद्दल नड्डा यांना नोटीस

केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांना नोटीस बजावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *