Breaking News

सचिन पायलट म्हणाले, पंतप्रधान मोदींनी कौतुक केल्यानंतर काय झालं ते सर्वांनी पाह्यलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाक्याचा संदर्भ देत केली टीका

राजस्थान विधानसभेच्या निवडणूका झाल्यापासून सचिन पायलट आणि अशोक गेहलोत गटामधील संदोपसंदी काही केल्या संपायला तयार नाही. मध्यंतरी तत्कालीन काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी या संदोपसुंदीवर मार्ग काढण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची ऑफर अशोक गेहलोत यांना दिली. मात्र अशोक गेहलोत यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद स्विकारण्याची तयारी दाखविली मात्र मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास असमर्थता दर्शविली. विशेष म्हणजे त्यावेळी अशोक गेहलोत गटाच्या समर्थक आमदारांनी सचिन पायलट मुख्यमंत्री नको म्हणून राजीनामा देण्याचे नाट्य रंगले होते.

२०२० मध्ये मध्य प्रदेशात झालेल्या सत्ताबदलापासून सचिन पायलट भाजपामध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्यापाठोपाठ राजस्थानमध्ये सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यातील अंतर्गत सत्तासंघर्ष वाढतच गेल्याचं दिसून आलं. नुकत्याच राजस्थानमधील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अशोक गेहलोत यांनी एकमेकांचं कौतुक केल्यानंतर त्यावरून राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. यारपार्श्वभूमीवर सचिन पायलट यांनी त्यासंदर्भात सूचक विधान केले.

राजस्थानच्या बसवाडा जिल्ह्यातील मानगड धाम परिसरात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी हजेरी लावली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी जगात जिथे कुठे जातात, तिथे त्यांचा सन्मान होतो, असं गेहलोत म्हणाले होते. त्यापाठोपाठ मोदींनीही त्यांचं कौतुक केलं होतं. अशोक गेहलोत आणि मी मुख्यमंत्री म्हणून एकत्र काम केलं होतं. ते देशातील सर्वात ज्येष्ठ मुख्यमंत्र्यांपैकी एक आहेत. त्याशिवाय ते अनुभवी राजकारणीही आहेत, असे कौतुकोद्गार मोदी यांनी काढले होते.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशोक गेहलोत यांचं कौतुक केल्याबाबत बोलताना सचिन पायलट यांनी सूचक विधान केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. मला वाटतं हा फार महत्त्वपूर्ण घटनाक्रम आहे. अशाच प्रकारे पंतप्रधानांनी संसदेत गुलाम नबी आझाद यांचं कोतुक केलं होतं. त्यानंतर काय झालं हे आपण सगळ्यांनी पाहिलं. त्यामुळे आता पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं ही बाब विशेष आहे. ही घटना आपण सहजपणे घ्यायला नको, असे सूचक वक्तव्य केले.

गुलाम नबी आझाद यांना दुसऱ्यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात न आल्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. राहुल गांधींच्या नेतृत्वावरूनही त्यांनी टीका केली होती. या सगळ्या घडामोडींच्या आधी पंतप्रधानांनी गुलाम नबी आझाद यांचं कौतुक केलं होतं. त्यामुळे आता अशोक गेहलोत हेही गुलाम नबी आझाद यांच्या वाटेनेच जाणार, असा सूचक इशाराच सचिन पायलट यांनी दिल्याचं सांगितलं जात आहे.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *