Breaking News

अनंत गीते यांनी पंतप्रधान मोदींना इशारा देत म्हणाले, उध्दव ठाकरेंनी ते प्रयत्न करू नयेत बंडखोर स्वार्थासाठी गेलेत जनतेच्या प्रश्नासाठी नाही

जवळपास एक महिन्यापासून शिवसेनेतील बंडखोरीवरून निर्माण झालेल्या परिस्थितीवरून राजकिय आणि सर्वचस्तरात चर्चेचा विषय झालेला आहे. त्यातच या बंडखोरीमुळे निर्माण झालेल्या घटनात्मक पेचावरही न्यायालयाकडून अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे नव्याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारही अद्याप अधांतरीच आहे. यापार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात शिवसेनेचे माजी केंद्रिय मंत्री मंत्री अनंत गीते यांनी शिंदेच्या बंडखोरीवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इशारा देत उध्दव ठाकरे यांनी आता बंडखोर परतण्यासाठी सुरु केलेले प्रयत्न आता करू नयेत असा सल्ला दिला.

बंडखोर हे जनतेच्या प्रश्नांसाठी नसून वैयक्तिक स्वार्थासाठी तिकडे गेल्याची करत ते पुढे म्हणाले, जे सुरू आहे ते दुर्दैवी आहे. फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी ज्यांनी कुणी बंड केले, त्यात जनतेचं हित काय आहे? ते कोकणच्या विकासासाठी गेले आहेत का? जनतेच्या प्रश्नासाठी गेले आहेत का? त्यात नुकसानच होणार आहे. पण या सगळ्या नुकसानाला जबाबदार हे बेईमान बंडखोर असणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

वैयक्तिक स्वार्थासाठी गेलेल्यांपैकी एकही आता परत येणार नाहीत. ते प्रयत्न उध्दव ठाकरेंनी करू नयेत. मी उद्धव ठाकरेंनाही सांगणार आहे. जे गेलेत, त्यांना मातीत गाडून टाकू आणि नव्याने शिवसेना उभी करू. बंडखोरांच्या गळ्यात पट्टा बांधला आहे आणि साखळी भाजपाच्या हातात आहे. त्यातला एकही परत येणार नाही असेही ते म्हणाले.

अशा प्रकारे शिवसेनेच्या गळ्याला नख लावण्याचं पाप करू नये असा इशारा आपण मोदींना देत असल्याचे सांगत मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना इशारा दिला आहे. इशारा हा शब्द मुद्दाम वापरतोय. फक्त राजकीय फायद्यासाठी, सत्तेसाठी शिवसेनेसारख्या कडवट हिंदुत्ववादी संघटनेच्या गळ्याला नख लावण्याचं पाप तुम्ही करू नका. नाहीतर संपून जाल. हे सांगण्याचं धाडस माझ्याकडे आहे. तुम्हाला कळत नाहीये की तुम्ही कोणतं पाप करत आहात. शिवसेना ही केवळ महाराष्ट्राची गरज नसून अखंड हिंदू राष्ट्राची गरज असल्याचा संतापही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महाड आणि रत्नागिरीच्या भुताला बाटलीत बंद करण्याची ताकद शिवसेनेत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. महाडमधून भरत गोगावले तर रत्नागिरीतून उदय सामंत आणि योगेश कदम हे बंडखोरांच्या गटात सामील झाले असल्याने या दोघांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांनी वरील टोला लगावला.

मी अलिबागच्या सभेत सांगितलंय की महाडच्या भुताला बाटलीत बंद करण्याची ताकद माझ्यात आहे. तुमच्या रत्नागिरीच्या भुतालाही बाटलीत बंद करण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे. कुठल्याही भुताला बाटलीत बंद करण्याची ताकद शिवसेनेत आहे. चिंता करण्याचं काही कारण नाही. रत्नागिरी असो किंवा दापोली असो असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

नारायण राणे, छगन भुजबळ यांनी केलेले बंड वैयक्तिक होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड भाजपाप्रणित आहे. या बंडातून सामान्य जनतेला किंवा शिवसैनिकांना काहीही मिळणार नाही. सत्तेसाठी लाचार झालेले हे आमदार बंडात सहभागी झाले आहेत. जे गेलेत ते परत येणार नाहीत. या बंडखोरांच्या गळ्यात भाजपाने पट्टा बांधला आहे. त्याची साखळी भाजपच्या हातात असल्याचेही ते म्हणाले.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *