Breaking News

देवेंद्र फडणवीसांनंतर आता शंकरराव गडाख यांनी दिला बंडखोरांना निष्ठेचा धडा मलाही फोन आला होता पण मी उध्दव ठाकरे यांच्यासोबतच राहणार

राज्यात एकाबाजूला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारला घालविले. त्यानंतर भाजपाच्या मदतीने राज्यात शिंदे-फडणवीस सरकारची स्थापनाही केली. मात्र सुरुवातीला मुख्यमंत्री पदासाठी नाव चर्चेत असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना अचानक भाजपा श्रेष्ठींनी उपमुख्यमंत्री पद स्विकारण्याचे आदेश दिल्यानंतर त्याचे पालन करणाऱ्या फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्ष पक्षनिष्ठेचा धडा दिला. आता फडणवीसांपाठोपाठ शिवसेनेचे समर्थक अपक्ष आमदार तथा माजी मंत्री शंकरराव गडाख यांनीही निष्ठा काय असते हे दाखवून देत बंडखोरांना निष्ठेच्या नैतिकतेचा आदर्श धडा घालून दिला. मात्र या दोन्ही उदाहरणानंतर बंडखोर आमदार काही शिकतील का? अशी चर्चा शिवसेनेत रंगली आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षात फूट पडली आहे. ४० आमदार शिंदे गटात सामील झाले आहेत. तर उरलेले १५ आमदार अद्याप उध्दव ठाकरे यांच्यासोबत आहेत. अपक्ष आमदार शंकरराव गडाख देखील उद्धव ठाकरेंसोबत आहेत. गडाख यांनी अहमदनगरमध्ये केलेल्या जाहीर भाषणात मोठं विधान करत म्हणाले की, शिवसेना ही जहाल संघटना असून बंडखोरी होताना रक्ताचे पाट वाहिले असते. मी अपक्ष आमदार म्हणून निवडून आलो असलो, तरी काही सिद्धांतामुळे मी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसोबत आलो होतो. बंडखोरी झाल्यानंतर देखील मी उद्धव ठाकरेंना फोन केला. मी तुमच्याबरोबर आहे आणि तुमच्याबरोबरच राहणार, असं मी त्यांना सांगितलं. त्यानुसार मी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलात आणला आहे. अडचणीच्या काळात मी उद्धव ठाकरेंसोबत राहिलो असल्याचे सांगितले.

या पध्दतीने मोठ्या पक्षाच्या नेत्याप्रती अपक्ष असूनही गडाख यांनी उध्दव ठाकरे यांच्या प्रती निष्ठा दाखविल्याने राजकिय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचविल्या आहेत.

अहमदनगर येथे आयोजित मेळाव्यात शंकरराव गडाख बोलत होते.

यावेळी बोलताना गडाख म्हणाले, मंत्रीपद गेलं याचं वाईट वाटत नाही, पण विकासकामं थांबतील, याचं वाईट वाटतंय. पण माझ्यामध्ये काही कौशल्ये आहेत, त्या कौशल्याच्या माध्यमातून मी विकासकामं पूर्ण करण्याचा जरूर प्रयत्न करणार आहे. पण वाईट याचं वाटतंय की उद्धव ठाकरे यांच्यासारख्या माणसाला अशा पद्धतीने घरी जावं लागलं आहे.

मला याठिकाणी एक आवर्जून सांगायचं आहे. उद्धवसाहेब हे अजिबात राजकीय व्यक्ती नाहीत. शिवसेना ही अतिशय जहाल संघटना आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकांच्या रक्तामध्ये एक वेगळी ताकद आणि रग निर्माण केली आहे, असे बंड होत असताना शिवसेनेसारखा पक्ष उद्धव ठाकरेंच्या हाती होता. राज्यामध्ये नव्हे तर देशात उद्धव ठाकरेंच्या जागी दुसरा नेता असता आणि शिवसेनेसारखी जहाल संघटना त्यांच्या हाती असती, तर बोट दाखवेपर्यंत रक्ताचे पाट वाहिले असते. पण या माणसाने स्वत: कमीपणा घेऊन हे सगळं थांबवलं. त्यांनी संयमाने भूमिका घेतल्याने पुढे काय झालं ते आपण सगळ्यांनी पाहिलं.

मी अपक्ष आमदार म्हणून निवडून आलो असलो, तरी काही सिद्धांतामुळे मी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसोबत आलो होतो. बंडखोरी झाल्यानंतर देखील मी उद्धव ठाकरेंना फोन केला. मी तुमच्याबरोबर आहे आणि तुमच्याबरोबरच राहणार, असं मी त्यांना सांगितलं. त्यानुसार मी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलात आणला आहे. अडचणीच्या काळात मी उद्धव ठाकरेंसोबत राहिलो असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, नवे सरकार स्थापन करण्याचा दावा करण्याच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा श्रेष्ठींनी दिलेल्या आदेशानुसार मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे हेच असतील जाहिर केले. मात्र या सरकारमध्ये मी सहभागी असणार नाही असे जाहिर केले. मात्र त्यास काही तासांचा अवधी लोटत नाही तोच पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आदेशानुसार आपण उपमुख्यमंत्री पदा स्विकारले. विशेष म्हणजे आपल्याच हाताखाली ज्युनिअर मंत्री राहिलेल्या व्यक्तीच्या हाताखाली आता स्वत:ला ज्युनिअर मंत्री म्हणून काम करण्याचा कमी असतानाही त्यांनी पक्षनिष्ठा म्हणून ते पद स्विकारले. तसेच पक्षाने सांगितले तर मी घरीही बसेन असे सांगायलाही ते विसरले नाहीत. त्यामुळे पक्षाच्या विरोधात बंड करणाऱ्या एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच सरकारला पाठिंबा देणाऱ्या भाजपाने बंडखोरांवर वरचढ डाव टाकत पक्षनिष्ठा काय असते याचे धडधडीत उदाहरण दाखवून दिले.

तर आता शिवसेनेला अपक्ष आमदार म्हणून पाठिंबा देणाऱ्या शंकरराव गडाख यांनी पाठिंब्याची निष्ठा काय असते हे आता दाखवून दिले. त्यामुळे शिवसेनेत गडाखांच्या या भूमिकेचे कौतुक करण्यात येत असून बंडखोर आमदारांनी या दोघांकडून तरी पक्षनिष्ठा काय असते हे शिकून घ्यावे असा उपरोधिक टोला शिवसेनेतील काही वरिष्ठ नेत्यांकडून लगावला.

Check Also

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *