Breaking News

शिवसेनेच्या खासदारांची भाजपबरोबर युतीला मुक संमती लोकसभेला हवी मात्र विधानसभेचा निर्णय तुम्हीच घ्या

मुंबईः प्रतिनिधी
आगामी लोकसभा आणि विधानसभेसह कोणत्याही निवडणूकीत भाजपबरोबर युती न करण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली. या घोषणेला ६ महिन्याचा कालावधी लोटूला तरी त्यावर शिवसेनेतूनच एकमत झाल्याचे दिसून येत नसून नुकत्याच झालेल्या खासदारांच्या बैठकीत उध्दव ठाकरे यांनी युतीबाबतच्या प्रश्नावर शिवसेनेच्या सर्वच खासदारांनी शांत राहणे पसंत करत एक प्रकारे लोकसभेसाठीच्या युतीच्या प्रस्तावाला मूक संमती देत विधानसभेबाबत तुम्हीच निर्णय घ्यावा अशी विनंती ठाकरे यांना केल्याची माहिती शिवसेनेच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी घोषणा केल्यानंतर त्यांची मनधरणी करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यापासून ते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यापर्यंत जवळपास सर्वच नेत्यांनी मातोश्रीचे उंबरठे झिजवले. परंतु उध्दव ठाकरे यांच्याकडून त्यावेळी कोणताच प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे भाजपबरोबरील युती होणार की नाही याबाबत शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. त्यातच आगामी निवडणूकांच्यादृष्टीने सर्वच पक्षांनी आपापल्या परीने मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून जाहीर केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने पुन्हा एकदा चाचपणी करण्यास सुरुवात केली. मात्र शिवसेनेच्या अनेक खासदारांबरोबरच आमदार आणि शिवसैनिकांना भाजपशी युती व्हावी अशी इच्छा आहे. शिवसेना व भाजपमध्ये युती झाली तरच राज्याच्या विधानसभेवर पुन्हा एकदा भगवा फडकण्याची शक्यता असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
शनिवारी शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक मातोश्रीवर बोलविण्यात आली होती. त्यावेळी भाजपबरोबर युती करायची की नाही याबाबतचा सवाल उध्दव ठाकरे यांनी खासदारांना केला. मात्र खासदारांनी ठाकरे यांच्या प्रश्नावर आपले कोणतेही थेट मत मांडण्याचे टाळत चुप्पी साधणेच पसंत केले. तसेच लोकसभेला युती केल्यास सेनेच्या जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभेला भाजपशी युती करावी आणि विधानसभेबाबत मात्र तुम्हीच निर्णय घ्यावा असा सूरही याबैठकीत खासदारांनी लावला. त्यामुळे भाजपबरोबरील युतीला या खासदारांची मुक समंती असल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपवर एकाबाजूला टीका करत दुसऱ्याबाजूला त्यांच्यासोबत सत्तेत रहावे लागत असल्याने शिवसेनेबद्दल राज्यातील सर्वसामान्य जनतेत चुकीचा संदेश जात आहे. त्यामुळे आगामी निवडणूकीत भाजपसोबत जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *