Breaking News

नाराज विनायक मेटे यांचा भाजपाला इशारा, अद्यापही वेळ गेली नाही विधान परिषद निवडणूकीत एकाही सहयोगी पक्षाला उमेदवारी नाहीच

विधान परिषद निवडणूकीसाठी भाजपाने आपले पाच उमेदवार जाहिर केले. या यादीत पंकजा मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आलेला असला तरी भाजपाला पाठिंबा देणाऱ्या एकाही सहयोगी पक्षाला उमेदवारी देण्यात आलेली नाही. भाजपाला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये रिपाई-आठवले गट, रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत आणि शिवसंग्राम संघटनेचे विनायक मेटे यांना डावलले गेले आहे. त्यामुळे नाराज झालेल्या शिवसंग्राम संघटनेचे विनायक मेटे यांनी उमेदवारीवरून भाजपाला इशारा दिला असून अद्यापही वेळ गेलेली नसल्याचे सूचक वक्तव्य केले.

भाजपाने विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आपल्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस (संगठन) श्रीकांत भारतीय, प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड आणि माजी मंत्री राम शिंदे, उमा खापरे यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, मित्रपक्ष असलेल्या शिवसंग्राम संघटनेने जाहीर नाराजी व्यक्त करत लवकरच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन याबाबत कळवणार आहोत. त्यानंतर शिवसंग्राम आपली भूमिका ठरवेल, अशी प्रतिक्रिया मेटे यांनी दिली.

इतर पक्षांना प्रामाणिकपणे सोबत घेतलं जातं. नंतर वाऱ्यावर सोडून दिलं जातं, ही भावना कार्यकर्ते तसेच महाराष्ट्रातील जनतेमध्ये पसरत आहे. मित्रपक्षांना डावलण्याची प्रतिमा भाजपाची होतेय. अजूनही वेळ गेलेली नाही. या सर्व गोष्टींचा विचार करुन आम्ही फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागणी करु असेही ते म्हणाले.

वेगळ्या पक्षांना सोबत घेतलं जातं तेव्हा धोका देऊ नये अशी अपेक्षा असते. मात्र हा विश्वास आता कुठेतरी डळमळत आहे. ही चांगली परिस्थिती नाही. अनेकवेळा अन्याय झालेला आहे. शिवसंग्रामचे दोन आमदार आहेत. बाकी कोणत्याही पक्षाचे आमदार नाहीयेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील मित्रपक्षांना डावलणार नाहीत अशी आमची अपेक्षा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

तसेच चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर शिवसंग्रामची भूमिका ठरवण्यात येईल. पण भूमिका घेण्याअगोदर त्यांनी मित्राचं कर्तव्य पार पाडावं असा संदेशही त्यांनी यावेळी भाजपाला दिला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *