Breaking News

शिवसेनेचे खासदारही आता उध्दव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटाकडे? राष्ट्रपती पदाच्या भाजपा उमेदवार द्रौपदी मुर्म यांना पाठिंबा देण्यासाठी ठाकरेंना पत्र

राज्यात शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील तब्बल ४० आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारत भाजपाच्या मदतीने राज्यात सरकारही स्थापन केले. त्यानंतर राज्यात उध्दव ठाकरेंचा गट सोडून शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसऱ्याबाजूला संसदेतील अनेक खासदार शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा राज्यात सुरु झालेली असतानाच दक्षिण मध्यचे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना पत्र लिहित राष्ट्रपती पदाच्या भाजपाच्या उमेदवार द्रोपदी मुर्म यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे खासदारही शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आदिवासी समाजातील सक्षम आणि कर्तृत्ववान महिला म्हणून शिवसेनेने भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. आमदारानंतर आणि खासदार भावना गवळी यांच्यानंतर आता इतर शिवसेना खासदारही भाजपाशी सहकार्याची भूमिका घेत असल्याचे दिसत आहे.

खासदार शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना भवनात भेट घेऊन त्यांना आपले पत्र दिले. आपल्या पत्रात खासदार शेवाळे यांनी द्रौपदी मुर्मू यांच्या संवेदनशील सामाजिक कार्याची आणि यशस्वी राजकीय वाटचालीचे कौतुक केले. त्यामुळे आमदारांपाठोपाठ आता शिवसेनेचे खासदारही पक्षाने भाजपाशी सहकार्य करावे, ही भूमिका मांडू लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीपाठोपाठ आता राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेना खासदारांची मते फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे.‌

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षीय राजकारणाला छेद देत, महाराष्ट्राची कर्तृत्ववान महिला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान व्हावी, यासाठी राष्ट्रपतीपदाच्या काँग्रेसच्या उमेदवार श्रीमती प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता. तसेच दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कर्तृत्वाचा आदर करत शिवसेनेने त्यांना पाठिंबा दर्शविला होता. हीच परंपरा कायम ठेवत शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा आणि त्यासाठी पक्षाच्या सर्व खासदारांना आदेश द्यावा, अशी विनंती शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

खासदार राहुल शेवाळे यांनी लिहिलेले पत्र आणि शिंदे गटात जाण्यासाठी शिवसेनेच्या खासदारांकडून सुरु असलेली चाचपणी यापार्श्वभूमीवर शिवसेनेत आता विधिमंडळानंतर संसदेतही फूट पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *