Breaking News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला, चिखल तुडवत गेलो…आम्ही वर्क फ्रॉम होम करत नाही…. इर्शाळवाडी भेटीवरून उद्धव ठाकरे यांच्यावर केली टीका

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे अलीकडेच दरड कोसळून ८४ जणांचा मृत्यू झाला होता. याठिकाणी बचावकार्य सुरु असताना अनेक राजकीय नेत्यांनी इर्शाळवाडीला भेट देत तेथील नागरिकांची भेट घेतली. यामध्ये उद्धव ठाकरे यांचाही समावेश होता. उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन इर्शाळवाडी दुर्घटनेमुळे विस्थापित झालेल्या आणि नातेवाईक गमावलेल्या कुटुंबियांची भेट घेत मी तुमच्यासोबत असल्याची ग्वाही दिली. याच भेटीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावत म्हणाले, काहीजण इर्शाळवाडीला व्हॅनिटी व्हॅन घेऊन गेले होते, तर काही जण चिखल तुडवत गेले. तर काही जण आजही वर्क फ्रॉम होम करत असल्याची खोचक टीका उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता करत आम्ही मात्र प्रत्यक्षात जाऊन काम करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

विधानसभेत इर्शाळवाडीप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवेदन करताना वरील केली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, इर्शाळवाडीत फार कठीण परिस्थिती होती. काही लोक व्हॅनिटी व्हॅनने त्याठिकाणी गेले होते. काही लोक चिखल तुडवत गेले होते. मी त्याठिकाणी गेलो, याचा मोठेपणा मी सांगत नाही. परंतु, मी तिथे गेल्यामुळे सगळ्या यंत्रणा वेगाने कामाला लागल्या. इकडे सभागृहात दोन्ही उपमुख्यमंत्री कंट्रोल रूमवर लक्ष्य ठेवून होते. एनडीआरएफसह यंत्रणा मोठ्या प्रमाणावर त्याठिकाणी पोहोचल्याने खूप मदत झाली. नुसता देखावा करायचे काम आम्ही कधी केलं नाही आणि करतही नाही. आम्ही सरकार म्हणून इर्शाळवाडीतील नागरिकांच्या पाठिशी उभे राहिलो. या सर्व नागरिकांची तात्काळ कंटेनरमध्ये राहण्याची सोय केली असून त्यांना सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. आम्ही तिकडेच पुर्नवसनासाठी भूखंडही बघितला. सिडकोला त्याठिकाणी पक्की घरे बांधून इर्शाळवाडीतील लोकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. आम्ही फक्त बोलून थांबत नाही तर प्रत्यक्षात कृती करतो. आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारे लोक आहोत. आम्ही वर्क फ्रॉम होम काम करत नाही, असा अप्रत्यक्ष टोला मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. यावर आता ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत पुराच्या पाण्यामुळे घरांचे आणि मालमत्तेचे नुकसान झालेल्यांसाठी आर्थिक मदतीची घोषणा केली. घर पाण्यात बुडालेले असल्यास, घरे पूर्णत: वाहून गेले असल्यास किंवा पूर्णपणे पडले असल्यास कपडयांच्या नुकसानीकरिता प्रति कुटुंब २५०० रुपये आणि घरगुती भांडी/वस्तु यांच्या नुकसानीकरिता प्रति कुटुंब २५०० रुपये असे ५ हजार रुपये देण्यात येतात. मात्र, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची अट शिथिल करून ही रक्कम आता दुप्पट करण्यात येत आहे. कपड्यांचे नुकसान आणि घरगुती भांडी कुंडीच्या नुकसानीसाठी आता १० हजार रुपये आर्थिक मदत करण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.

सेवक असलेल्या व्यक्तीचेही ६ हजार असलेले वेतन आम्ही ३० हजार रूपये केल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आमचे डबल इंजिन असलेले सरकार चांगले काम करत असल्याचे पाहून अजित दादा पवार यांचे तिसरे इंजिनही आमच्यासोबत आले. त्यामुळे आमचे ट्रिपल इंजिनचे सरकार झाले आहे. जे लोक फक्त टीका करतात त्यांच्या टीकेला आम्ही कामातून उत्तर देतो. त्यामुळे लोकांसाठी आम्ही सगळा पैसा खर्च करतो हे सरकार शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे सरकार आहे असे वक्तव्य केले.

त्यावर काँग्रेसचे नेते नाना पटोले म्हणाले म्हणून राज्याच्या डोक्यावर कर्जही वाढवून ठेवलेय.

त्यावर मुख्मयंत्री शिंदे म्हणाले, अहो नाना भाऊ तुम्ही चांगले आहात, मी तुमच्याबद्दल बोलत नाही. पण जे काही केले ते काही आम्ही घरे भरण्यासाठी कर्ज काढले नाही. तर सर्वसामान्यांसाठीच काढले असून त्या कर्जातून लोकांसाठीच आम्ही कामे करत असून तोच फायदा लोकांपर्यंत पोहोचवत आहोत असा खुलासाही केला.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *