Breaking News

चुकीच्या माहितीच्या आधारे टीका नको ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कोणत्याही किल्ल्यावर हॉटेल नसल्याचा भाजपा प्रवक्ते माधव भांडारी यांची सारवासारव

मुंबईः प्रतिनिधी
छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी पराक्रम गाजवलेल्या कोणत्याही ऐतिहासिक महत्त्वाच्या किल्ल्यावर हॉटेल होणार नाही. पर्यटन खात्यातर्फे विकासासाठी उपलब्ध करून देण्यात येणारे किल्ले हे कोणत्याही संरक्षित किल्ल्यांच्या यादीतील नाहीत, असे असताना विरोधकांनी चुकीच्या माहितीच्या आधारे टीका टिप्पणी करत असून ते जनतेमध्ये संभ्रम पसरवत असल्याची सारवासारव भाजपाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी शुक्रवारी केली.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार काही किल्ल्यांचे संवर्धन करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड किल्ला किंवा त्यासारख्या महत्त्वाच्या ऐतिहासिक किल्ल्यांच्या संवर्धन आणि विकासासाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. हा ऐतिहासिक वारसा जपण्यास सरकार वचनबद्ध आहे. याबाबतीत आधीच्या काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या तुलनेच भाजपा महायुती सरकारची कामगिरी फारच सरस आहे. किल्ल्यांच्या विषयावरून आज सरकारवर टीका करणाऱ्यांनी आपली सत्ता असताना आपले नेते कितीवेळा रायगडावर दर्शनासाठी गेले आणि रायगडाचे पावित्र्य जपण्यासाठी त्यांच्या सरकारने किती निधी उपलब्ध केला याचा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला हिशेब द्यावा असे आव्हानही त्यांनी विरोधकांना दिले.
केंद्र आणि राज्य सरकारकडून ज्या ऐतिहासिक महत्त्वाच्या किल्ल्यांचे संवर्धन होते, त्याखेरीज काही किल्ले राज्यात आहेत. असे किल्ले काळाच्या ओघात उध्वस्त होऊ नयेत, त्यांचा दुरुपयोग होऊ नये, त्यांचे संवर्धन करून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती करावी आणि पर्यटकांचा तेथे वावर वाढावा या हेतूने राज्य सरकारने ऐतिहासिक महत्त्व नसलेले किल्ले खासगी विकासकांना विकासासाठी भाडेतत्वावर देण्याचे धोरण आखले असून हे धोरण ठरवताना भाडेतत्त्वावर किल्ला दिला तरी त्याचा मालकी अधिकार हा कायमस्वरुपी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे राहील याची खबरदारी घेतली आहे. तसेच खासगी विकासक काम करत असताना किल्ल्याचे स्वरुप धंदेवाईक होऊ नये यासाठी पुरातत्व विभागाच्या मान्यतेने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची अटही घातलेली आहे. त्यामुळे कोणतेही धंदेवाईक हॉटेल उभे करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी अनेकदा रायगडावर जाऊन छत्रपती शिवरायांना आदरांजली अर्पण केली आहे. रायगडाच्या संवर्धनासाठी छत्रपती खा. संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखालील समितीचे काम चांगल्या रितीने चालू आहे. या कामासाठी राज्य सरकारने कोट्यवधी रुपये उपलब्ध करून दिले. मराठ्यांच्या इतिहासाचा वारसा सांगणाऱ्या इतर किल्ल्यांच्या संवर्धनासाठीही राज्य सरकार स्वतः निधी खर्च करून काम करत आहे. यापैकी कोणतेही काम आज टीका करणाऱ्यांनी केलेले नाही. शिवरायांना नमन करण्यासाठी रायगडावर जाण्यास ज्यांना सवड नाही, अशा जाणत्या नेत्याचे अनुयायी आज राज्यातील गडकिल्ल्यांच्या मुद्द्यावरून टीका करत असल्याची उपरोधिक टीकाही त्यांनी केली.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *