Breaking News

निवडणूक आश्वासन: पीएमएवायच्या लाभार्थ्यांना मिळणार ३.५० लाखाचे अनुदान

मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पातील लाभार्थ्यांनाच मिळणार अनुदान

मुंबई : प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणूका येण्यास काही दिवसांचा अवधी शिल्लक राहीलेला असतानाच  पंतप्रधान आवास योजना अर्थात पीएमएवायतंर्गत घर घेणाऱ्या लाभार्थ्यांना आता ३.५० लाख रूपयांचे अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्या अनुषंगाने केंद्राने नुकतेच राज्य सरकारला पत्र पाठविल्याची माहिती नगरविकास विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

पीएमवाय योजनेखाली २०२२ पर्यंत १ कोटी घर उभारणीचे उद्दीष्ट केंद्राने ठरविले आहे. यापैकी तब्बल ७० लाख घरांच्या प्रकल्पास केंद्राने मंजूरी दिली. परंतु, दिवसेंदिवस घर बांधणीच्या खर्चात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने स्वस्त व हलक्या वजनाची (लाईट हाऊस) घरे उभारण्याचाही निर्णय घेतला आहे. त्यामुळे घरबांधणीच्या खर्चात मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे. या पध्दतीची घरे बांधण्यासाठी कमी खर्च येणार असला तरी लाभार्थ्यांनी या पध्दतीची घरे बांधावीत यासाठी जास्तीत जास्त अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

सद्यपरिस्थितीत केंद्राकडून पीएमएवायखालील घर बांधणीसाठी बँक कर्जाच्या व्याजात ६ टक्के व्याज माफी देण्यात येते. कर्जफेडीची मुदत आणि एकूण व्याज यामधून तब्बल १.५० लाख रूपयांचे अनुदान लाभार्थ्यांना केंद्राकडून देण्यात येत आहे. याच अनुषंगाने हलक्या वजनाची घरे उभारणीतही खर्चाला मोठी कात्री लागणार आहे. त्यामुळे या १.५० लाख रूपये व्याजाच्या अनुदाना व्यतीरिक्त आणखी दोन लाख रूपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या हलक्या घरांच्या उभारणीसाठी देशभरातील ६ ठिकाणी मोठे गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यातील एक प्रकल्प महाराष्ट्रातील पुण्यात राबविण्यात येणार आहे. या मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या उभारणीसाठी जाहीर निविदा मागविण्यात येणार असून नवी ग्लोबल टेक्नोलॉजी अर्थात तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या कंन्स्ट्रक्शन कंपनीला घर बांधणीचे कंत्राट देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारला किमान दोन हेक्टर पर्यंतची जमिन उपलब्ध करून देण्याचे आदेशही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.    

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *