Breaking News

१० वीच्या पुस्तकातील तो नकाशा नाहीच तर ती केवळ प्रतिमा पाठ्यपुस्तक मंडळाचा खुलासा

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक आणि संशोधन मंडळाने १० वीच्या तयार केलेल्या पाठ्यपुस्तकात जम्मू काश्मीरचा जो नकाशा दाखविण्यात आला त्यामधील बराचसा भाग देशाच्या सीमेबाहेर दाखविण्यात आल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. त्यास तात्काळ पाठ्यपुस्तक मंडळाने त्यावर तात्काळ खुलासा करत तो नकाशा नसून अद्यावयत तंत्रज्ञानाने तयार केलेली प्रतिमा असल्याचा सारवासारवा महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे संचालक डॉ.सुनिल मगर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केली आहे.

के. यू. सोनवणे यांनी इ.१० वी भूगोल पाठ्यपुस्तक संबंधी दिलेल्या बातमीच्या आधारे विरोधी पक्षनेते मा. विखे पाटील साहेब यांनी मा. मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. उपरोक्त संबंधीत वृत्ताबाबत दि. २६ व २७ एप्रिल २०१८ रोजी भूगोल समिती सभेत चर्चा झाली. संबंधीत वृत्तातील प्रत्येक मुद्‌द्याचा अभ्यास करून भूगोल विषय समितीने पुढील खुलासा तयार केला आहे.

(१) देशाच्या राष्ट्रध्वजातील अशोकचक्राचा रंग ध्वजसंहितेनुसार नाही.

सदर ध्वजाचे देण्यात आलेले चित्र योग्य आहे. चार रंगातील चित्रांची छपाई करताना अशा प्रकारे रंगछटेमध्ये बदल होऊ शकतात. असे काही बदल झाल्यास तो छपाईच्या संदर्भाने तांत्रिक मर्यादेचा भाग असतो. तशा प्रकारची स्पष्ट टीप पाठ्यपुस्तकातील प्राथमिक पृष्ठात दिलेली आहे.

वरील मुद्द्याच्या अनुषंगाने श्री. के. यू. सोनवणे यांनी भूगोल विषयाच्या समीक्षणा दरम्यान (०७/१०/२०१७ ते ०९/१०/२०१७) हा प्रश्न उपस्थित केलेला नव्हता, असे त्यांची समीक्षण प्रत अवलोकली असता निदर्शनास आले आहे.  सोबत त्याची प्रत जोडली आहे.

(२) पृष्ठ क्र. २४ वरील नकाशामुळे जम्मू काश्मीरच्या उत्तरेकडील भूभाग स्पष्ट होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यामंध्ये काश्मीरच्या उत्तर सीमेबाबत गोंधळ निर्माण होईल.

पृष्ठ क्र. २४ वर स्वाध्यायात दिलेली आकृती ही नकाशा नसून ती अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार केलेली ‘प्रतिमा’ आहे. भारतीय भूभागाच्या प्राकृतिक रचनेचे स्वरूप सुस्पष्ट होण्यासाठी सदर प्रतिमा देण्यात आली आहे. या प्रतिमेला ‘यथार्थ दर्शक प्रतिमा’ म्हणतात. (DEM – Digital Elevation Model) ही प्रतिमा त्रिमितीय असून ही प्रतिमा काढताना त्रिकोणमितीचा उपयोग केला जातो. अशी प्रतिमा ही दोन लुप्त बिंदूंच्या साहाय्याने तयार केली जाते. याचा वापर प्राकृतिक रचनेतील फरक स्पष्ट होण्यासाठी करतात. हिमालयाच्या रांगा स्पष्ट दिसाव्यात म्हणून ही प्रतिमा तिरकी करून वापरली आहे. त्यामुळेहिमालयाच्या उंच रांगा, मैदानी प्रदेश, भारतीय पठारे व पूर्व–पश्चिम घाट ही प्राकृतिक रूपे प्रतिमेमध्ये सुस्पष्ट दिसत आहेत. सदर प्रतिमा राजकीय नकाशा नाही.

या प्रतिमेचा उपयोग विद्यार्थ्यांना स्वाध्यायातील प्रश्न सोडवण्यासाठी होणार आहे. या नावीन्यपूर्ण पद्धतीने तयार होणार्‍या प्रतिमा भविष्यात विद्यार्थ्याना हाताळायला लागतील हे लक्षात घेऊन काळानुरूप शिक्षणाच्या अनुषंगाने आवश्यक बदल केलेली ही त्रिमिती प्रतिमा जाणीवपूर्वक देण्यात आली आहे.

सदर प्रतिमा समीक्षणाच्या प्रती मध्ये नव्हती. त्यामुळे श्री. सोनवणे यांनी याबाबत सूचना केल्याचा दावा अयोग्य व दिशाभूल करणारा आहे.

(३) स्त्री शिक्षकांना ‘मॅडम’ ऐवजी ‘बाई’संबोधावे अशी सूचना श्री. सोनवणे यांनी केली होती,परंतु या सूचनेवर समीक्षणास उपस्थित असलेल्या सर्व महिलातज्ज्ञ शिक्षकांनी प्रखर विरोध केला होता. त्यामुळे सदर सूचना समीक्षणातच बाद करण्यात आली. समीक्षणा दरम्यान श्री सोनवणे महिला शिक्षकांना मॅडम म्हणूनच संबोधत होते, हे येथे नमुद करणे आवश्यक आहे.

(४) पृष्ठ क्र. ५ वर देण्यात आलेली देवटाके या रंगीत चित्रातील पाण्याचा रंग निळा दाखवणे.

सदर देवटाके चित्र नसून छायाचित्र (Photo) आहे. त्यामुळे त्याच्या रंगामध्ये असा कोणताही बदल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. याचप्रमाणे श्री. सोनवणे यांचे इतर दावे जसे सिंहगडावरील खाद्यपदार्थ, कुलाबा किल्ल्याच्या किनार्‍यापासूनचे अंतर इत्यादी मुद्दे हे त्यांचे वैयक्तिक मत असून त्याबाबत सुधारणांची आवश्यकता समितीला वाटत नाही.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *