Breaking News

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असणारा नेता गेला कृषी मंत्री पांडूरंग उर्फ भाऊसाहेब फुंडकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई : प्रतिनिधी

राज्याच्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज आणि राज्याचे कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज पहाटे ४.३५ वाजता सोमय्या रूग्णालयात निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार असून उद्या सकाळी ११ वाजता त्यांच्यावर त्यांच्या खांमगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

काल दुपारी त्यांना श्वासोच्छासाचा त्रास सुरु झाल्याने भाऊसाहेबांना सुरुवातीला ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना सोमय्या हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले आणि तेथेच पहाटेच्यावेळी त्यांची प्राणज्योत मालवली.

भाऊसाहेबांची राजकिय कारकिर्द बुलढाणा जिल्ह्यातून सुरु झाली. शालेय जीवनापासूनच ते राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी जोडले गेले. त्यानंतर पुढे भाजपच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनेतही काम केले. त्यानंतर आणीबाणीच्या काळात सत्याग्रह केल्याने त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला.

जन्मतारीख – २१ ऑगस्ट १९५० जन्मस्थळ – नारखेड ता. नांदुरा, जिल्हा बुलडाणा शिक्षण – एम ए इकॉनॉमिक्स पांडुरंग फुंडकर सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आले होते.

त्यानंतर त्यांनी भाजपचे कार्यकर्ता म्हणून काम सुरू केले. फुंडकर पहिल्यांदा १९७८ मध्ये आमदार म्हणून निवडून आले. १९८५ पर्यंत ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते. त्यांनी महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्षपददेखील भूषवले होते. अकोला लोकसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा खासदार म्हणून ते निवडून आले. पांडुरंग फुंडकर विधानपरिषदेतील विरोधपक्षनेतेही होते.
१९७८ आणि १९८० मध्ये फुंडकर खामगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. सध्या ते विधान परिषदेचे सदस्य होते. ८ जुलै २०१६ रोजी त्यांनी फडणवीस सरकारमध्ये कृषिमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शेती-सहकाराच्या परिवर्तनासाठी प्रयत्नशील असणारा नेता गमावला- मुख्यमंत्री

राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग उर्फ भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून त्यांच्या निधनाने कृषी, सहकार आणि संबंधित विषयांची सखोल जाण असणारा आणि या क्षेत्रात सकारात्मक परिवर्तनासाठी प्रयत्नशील असणारानेता राज्याने गमावला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. फुंडकर यांच्या निधनामुळे मी एक ज्येष्ठ सहकारी आणि मार्गदर्शकाला मुकलो आहे. शेती आणि सहकारासह संबंधित विविध विषयांची  त्यांना सखोल  जाण होती. ‪विरोधी पक्षनेते, आमदार, संसद सदस्य, भाजपचे प्रदेशाध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी भक्कमपणे सांभाळताना  पक्षाला नव्या उंचीवर नेण्यात मोठे योगदान दिले. सध्या राज्यात शाश्वत शेती विकासासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांमध्ये त्यांचा कृषीमंत्री म्हणून  मोठा पुढाकार होता. उन्नत शेती- समृद्ध शेतकरी योजना, पीक विमा योजना, गटशेती, एकत्रित क्रॉपसॅप योजना, महावेध प्रकल्प, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग अशा अनेक  महत्त्वपूर्ण उपक्रम-योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांचे कसोशीने प्रयत्न होते.

मातीशी घट्ट नाळ असणारा नेता गेला- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

पांडूरंग फुंडकर यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. विदर्भातील एका ज्येष्ठ, सहृदयी, मातीश घट्ट नाळ असलेला नेत्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. जनतेने त्यांना सलग तीनवेळा भारतीय संसदेवर प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. यावरून त्यांच्या लोकप्रियतेची प्रचिती येते. अतिशय मनमिळावू, मृदू स्वभावाचे असलेले फुंडकर यांनी विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदी असताना आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष पदी असताना जनतेच्या प्रश्नावर कणखर भूमिका घेतली. त्यांच्या जाण्याने राजकिय व सामाजिक क्षेत्रात त्याची पोकळी सतत जाणवत राहील.

संवेदनशील व अनुभवी लोकप्रतिनिधी काळाच्या पडद्याआड– विरोधी पक्षनेते विखे-पाटील

राज्याचे कृषीमंत्री भाऊसाहेब उपाख्य पांडुरंग फुंडकर यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांच्या निधनामुळे एक संयमी, संवेदनशील व अनुभवी लोकप्रतिनिधी काळाच्या पडद्याआड गेला. त्यांनी राज्याच्या राजकारणात स्वतःची एक वेगळी प्रतिमा निर्माण केली होती. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून समोर येत त्यांनी राजकारणात मोठे काम केले. आमदार, खासदार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, राज्याचे मंत्री अशी अनेक पदे त्यांनी भूषवली. राजकारणात मिळालेल्या प्रत्येक संधीला त्यांनी प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला. विशेषत: कृषि क्षेत्रातील प्रश्नांवर आम्ही अनेकदा चर्चा करायचो. राहुरी कृषी विद्यापिठाने एक अभ्यासक्रम बंद केल्यासंदर्भात गेल्याच आठवड्यात आमची चर्चा झाली होती. ते आमचे अखेरचे संभाषण असेल, अशी शंकाही त्यावेळी मनाला शिवली नव्हती. परंतु, काळाने अचानक घाला घालून सर्वांचे मित्र असलेले व्यक्तीमत्व हिरावून घेतले.

कृषी, सहकार व ग्रामीण भागाची जाण असणारे नेतृत्व गेले- अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे कृषी, सहकार व ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण असणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *