Breaking News

ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झालेल्या मतदान केंद्रावर फेरमतदान घ्या मतमोजणीवेळी व्हीव्हीपँटच्या स्लीपचीही मोजणी करा

मुंबई : प्रतिनिधी

पालघर व भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानावेळी या दोन्ही मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया खोळंबली. भंडारा-गोंदिया मतदारसंघात तर जवळपास २५ टक्के ईव्हीएम आणि व्हीव्हीपँट यंत्रामध्ये बिघाड झाल्याने तासन् तास रांगेत उभे राहूनही मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला नाही. ज्या मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला त्या सर्व मतदान केंद्रावर फेरमतदान घ्यावे आणि मतमोजणीवेळी व्हीव्हीपँट स्लीपचीही मोजणी करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली.

निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. मात्र आज दुर्देवाने तसे होताना दिसत नाही. भाजप कार्यकर्ते खुले आम मतदारांना पैसे वाटत होते, काही कार्यकर्त्यांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडण्यात आले. भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्र्यांनी वारंवार निवडणूक आचारसंहितेचा भंग केला. याबाबत काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या तरी निवडणूक आयोगाने काहीही कारवाई केली नाही. मतदानापूर्वी मतदारांना पोल चीट देण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे मात्र अनेक ठिकाणी मतदारांना पोल चीट वाटल्या गेल्या नसल्याचे त्यांनी सांगितले.

जवळपास २५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानयंत्रामध्ये बिघाड होणे संशयास्पद आहे. उन्हामुळे व तापमानामुळे मतदानयंत्रे खराब होतात हे निवडणूक आयोगाने दिलेले स्पष्टीकरण पटण्यासारखे नाही. देशात यापूर्वी ही अनेकदा उन्हाळ्यामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली आहे. दोन आठवड्यापूर्वीच कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकाही कडक उन्हाळ्यात मे महिन्यामध्येच पार पडल्या होत्या तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदानयंत्रामध्ये बिघाड झाले नव्हते. आज देशभरात विविध ठिकाणी होणा-या पोटनिवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात ईव्हीएम मशीन खराब झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या ईव्हीएम मशीन गुजरातमधून आणल्याची माहिती मिळते आहे त्यामुळे संशयात अधिक भर पडत आहे.  उन्हामुळे मशीन खराब होते तर आयोगाने ईव्हीएम ऐवजी बॅलेटपेपरवर मतदान का घेतले नाही? असा संतप्त सवाल करून या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *