Breaking News

भाजपाने दिला लोणकर कुटुंबियांना कर्जफेडीसाठी आर्थिक मदतीचा हात स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांच्या १९.९६ लाखांच्या थकित कर्जाची परतफेड

मुंबई: प्रतिनिधी

एमपीएससी परीक्षा पास होऊन सुद्धा मुलाखती होत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्निल लोणकरच्या कुटुंबियांवर असलेल्या १९ लाख ९६ हजार ९६५ रूपयांच्या कर्जाची परतफेड करणारा धनादेश आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुपूर्द केला.

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा छोटेखानी कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. स्वप्निल लोणकरचे वडिल सुनील तात्याबा लोणकर यांना हा १९ लाख ९६ हजार ९६५ रूपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. शिवशंकर ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्यादित या संस्थेचे या कुटुंबियांवर कर्ज होते. आधीच स्वप्निलची आत्महत्या, त्यातून घरातील प्रिटींग प्रेस बंद आणि अशात पतसंस्थेकडून कर्जाचा तगादा यामुळे हे कुटुंब त्रस्त होते. अखेर या कर्जाची रक्कम त्या कुटुंबियांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने देऊन त्यांना दिलासा देण्यात आला. यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, गोपीचंद पडाळकर, मंगेश चव्हाण आणि इतरही नेते उपस्थित होते.

यापूर्वी लोणकर कुटुंबियांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भेट घेवून स्वप्नील लोणकर याच्या बहिणीला भविष्यकाळात रोजगार अर्थात नोकरी मिळण्याच्यादृष्टीने आवश्यक असलेली सर्व मदत करण्याचे आदेश दिले. तसेच लोणकर कुटुंबियांच्या पाठिशी सतत राहणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

त्यानंतर आज भाजपा नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित छोटेखानी कार्यक्रमात स्वप्नील लोणकर याचे वडील सुनिल लोणकर यांना त्यांच्यावर असलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी जवळपास २० लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *