Breaking News

अजित पवार म्हणाले, अरे मी सातवेळा बारामतीतून का निवडूण आलो? कारण… आमदारांना पाडा आणि विकास काम करा

एका कार्यकर्त्याने विरोधी पक्षनेते अजित पवारांना चिट्ठी देत वाचून घ्या म्हटलं. यावर अजित पवारांनी मिश्किल टिपण्णी केली. या चिट्ठीत म्हटलं होतं की, बारामती, माढ्यात ज्या प्रमाणे विकास झाला तसा उस्मानाबादचा विकास करा. हे वाचल्यानंतर अजित पवारांनी भरसभेत या कार्यकर्त्याला ‘आमदार पाडा आणि विकास करा’, असा खोचक टोला लगावला. ते शनिवारी (१ ऑक्टोबर) उस्मानाबादमध्ये एस. पी. साखर कारखान्याच्या गळीत हंगाम उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

कार्यकर्त्याने दिलेल्या चिट्ठीत लिहिलं होतं की, शेतकरी जीवंत राहिला, तर पक्ष १०० टक्के जीवंत राहतो. शेतकरी सक्षम करण्यासाठी पाणी महत्त्वाचे आहे. १५० आमदारच का, २८८ का नाही? तसेच सोयाबीनच्या भावावरही विचारणा केली होती.

त्यावर अजित पवार म्हणाले, अरे मग तेच सांगतोय ना शहाण्या. बरं झालं याने सांगितलं. शरद पवार १० वर्षे कृषीमंत्री असताना राष्ट्रीय फलोत्पादन योजना त्यांनी आणली. देशातील शेतकऱ्यांचं ७२ हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं. कांद्याचे दर पडले तेव्हा शरद पवारांनी निर्यातबंदी उठवली आणि कांदा निर्यात करून चांगला भाव मिळवून दिला. सगळ्यांना आधारभूत किंमत, विद्यापीठं दिली.

केंद्रीय कृषीमंत्रालयात फिरा, ते आजही म्हणतात की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत जेवढे कृषीमंत्री झाले त्यात शेतकऱ्यांबद्दल बारकाईने जाण असलेला एकच कृषीमंत्री झाला आणि तो म्हणजे शरद पवार, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

निवडणुकांमध्ये जे राजकारण करायचं ते आपण करू. आपआपल्या पक्षांची ध्येयधोरणं मांडू, पण संस्था चालवताना हा जवळचा, हा लांबचा असं करायचं नाही, असे सांगत ते पुढे म्हणाले, माझी विनंती आहे की, शेवटी सर्व शेतकरी समाज आपला आहे. कुणीच कुणाचा कायमचा बांधिल नसतो. आपण चांगलं काम केलं, लोकांना विश्वास दिला, तर लोक आपल्या मागे उभे राहतात. बाबांनो मी सातवेळी बारामती मतदारसंघातून निवडून आलो. यावेळी मी एक लाख ६५ हजार मताधिक्याने निवडून आलो. सर्व विरोधी उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाली. का झाली? कारण, मी तिथं भेदभावच करत नाही. एखाद्याने निवडणुकीत माझ्या विरोधात काम केलं आणि मी निवडून आलो तरी त्यांची कामं करतो. मी निवडून आल्यावर संपूर्ण मतदारसंघाचा आमदार होतो. त्यावेळी मी विरोधी काम करणाऱ्यांचंही काम करण्याचा प्रयत्न करतो. तेच लाजंकाजं म्हणतं मतदान न करताही यानं काम केलं, पुढच्यावेळी यालाच मतदान करायचं. माझं काम असं असतं. तशी इथं पद्धत नाही असेही ते म्हणाले.

मघाशी सुरेशरावांनी सांगितलं की, राष्ट्रवादी काँग्रेस संपली. अरे, राष्ट्रवादीचे नेतेच राष्ट्रवादी संपली म्हणत असतील, तर या कार्यकर्त्यांनी कुठं बघायचं? कधीही कुठलाही पक्ष संपत नसतो. एकेकाळी भाजपाचे अख्ख्या देशातून दोन खासदार निवडून आले होते. ते डगमगले नाही, खचले नाही, ना उमेद झाले नाही. दोन तर दोन तिथून सुरुवात करू म्हणत त्यांनी काम केलं आणि आता दोन पंचवार्षिकला ते बहुमताने निवडून आलेत,असेही अजित पवार यांनी सांगितले.

कुठेच कुणाची मक्तेदारी नसते. लोकं कोणाचं नेतृत्व चांगलं आहे, कुणाचे विचार चांगले आहेत, कुणाची कामाची पद्धत चांगली आहे, हे पाहतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *