Breaking News

सांस्कृतिक क्षेत्रातल्या शिरकावासाठी भाजपला ’प्रसाद’चा आधार नाट्य परिषद हिसकावून घेण्यासाठी ताव़डेंचे पवारांना आव्हान

मुंबईः प्रतिनिधी

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या निवडणूकांचे पडघड वाजायला सुरुवात झाली. या निवडणूकीला अद्याप एक महिना शिल्लक असतानाच दुसऱ्याबाजूला या नाट्य परिषदेच्या निवडणूकीच्या निमित्ताने सांस्कृतिक क्षेत्रातील शिरकावासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी नाट्य निर्माता संघाच्या कांबळींना पाठबळ देत भाजपला प्रसाद चा आधार निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती पुढे आली आहे.

मागील अनके वर्षापासून अखिल भारतीय नाट्य परिषदेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे या परिषदेवर पवार यांच्याच मर्जीतील व्यक्तीची नियुक्ती होत आली आहे. मात्र यंदा पहिल्यांदाच २२ जानेवारी रोजी अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरताना विद्यमान अध्यक्ष मोहन जोशी यांनी सदस्य नसलेल्या व्यक्तीची उमेदवारी अर्जावर  सही घेतल्याने जोशी यांचा अर्ज बाद ठरला. त्यामुळे यंदाचे अध्यक्ष पद भाजप समर्थन असलेल्या उमेदवाराला मिळवून द्यायचा चंग सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी बांधला असून त्यासाठी नाट्य परिषदेच्या अन्य सदस्यांवर तावडे यांच्या कार्यालयातून सतत फोन करण्यात येत असल्याची माहिती अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या एका सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

साधारणतः ७ ते ८ वर्षापूर्वी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत प्रसाद कांबळी यांचे वडील स्वर्गीय अभिनेते मच्छिद्र कांबळी यांचा पराभव मोहन जोशी यांनी केला होता. त्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठीच प्रसाद कांबळी यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र मोहन जोशी यांचा अर्जच बाद झाल्याने भाजपला सांस्कृतिक क्षेत्रात शिरकाव करण्याची आयती संधी चालून आली आहे. त्यातच जोशींना पर्याय ठरू शकेल असा दुसरा उमेदवार शरद पवार यांच्या दृष्टीत नसल्याचे दिसते. त्यामुळे काहीही करून अध्यक्ष पदावर भाजप पुरस्कृत उमेदवार निवडूण आणण्यासाठी तावडे यांनी पुढाकार घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

नाट्य परिषदेच्या निवडणूकीच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी शरद पवार यांना आव्हान दिल्याची चर्चा नाट्य क्षेत्रात रंगली आहे. नाट्य परिषदेच्या ६० जागांसाठी ४ मार्चला मतदान होणार असून यासाठी १२२ उमेदवार रिंगणात आहेत.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *