Breaking News

निवडणूकीपूर्वीच ‘मोहन जोशी पॅनल’ने मारली बाजी! राज्यभरातील २८ बिनविरोध विजयी उमेदवारांचा पाठिंबा

मुंबई : प्रतिनिधी

मी आजवर नाट्य परिषदेची सेवाच केली असून ‘मोहन जोशी पॅनल’मधील सर्व उमेदवार हाच वसा जोपासत कार्य करणार असल्याची ग्वाही देत मोहन जोशी यांनी राज्यभरातील २८ बिनविरोध विजयी उमेदवारांचा पाठिंबा असल्याचे जाहिर करीत विरोधकांची हवाच काढून टाकली आहे. ‘मोहन जोशी पॅनल’च्या उमेदवार आणि त्यांच्या कार्याची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जोशी यांच्यासह त्यांच्या पॅनलमधील उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त केले.

अर्ज बाद झाल्याने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची २०१८-२३ ही निवडणूक लढवू शकत नसलो तरी ‘मोहन जोशी पॅनल’च्या माध्यमातून आपण रंगभूमीची सेवा करणारे तगडे उमेदवार उभे केले असल्याचे मोहन जोशी यांचे म्हणणे आहे. आमचे उमेदवार तरुणही आहेत आणि अनुभवीही असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांना टोला हाणला आहे. नाट्य निर्मात्या लता नार्वेकर यांनीही विरोधकांचा खरपूस समाचार घेत केवळ विरोधासाठी विरोध होत असल्याचे म्हटले. नाट्य परिषदेला कर्जमुक्त करण्याचे कार्य मोहन जोशी यांनी केले असून त्यांचे पॅनलच पुन्हा एकदा निवडून येण्यासाठी योग्य असल्याचे राज्यभरातील २८ बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांनी पाठिंबा देत सिद्ध केले असल्याचेही लता नार्वेकर म्हणाल्या. बोलण्याच्या ओघात मोहन जोशी अध्यक्ष होणार की अन्य कोणी हे निवडणूकीनंतर ठरवू असे सांगत जोशींच्या गळ्यात पुन्हा एकदा अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यताही लता नार्वेकरांनी वर्तवली. विजय गोखले यांनी नाना पाटेकरांच्या वक्तव्यावर मिश्कील भाषेत प्रतिक्रिया देत आपल्या भावना व्यक्त केल्या. चारुशीला वाच्छानी यांनीही ‘मोहन जोशी पॅनल’चे सर्व उमेदवार धडाडीचे कार्यकर्ते असल्याचे म्हटले. सुशांत शेलारने स्वत:वर सुरू असलेल्या खटल्यावर सावध प्रतिक्रिया देत आपल्याला बदनाम करण्याचा डाव असल्याचे सांगत प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने अधिक बोलणे टाळले. या पत्रकार परिषदेला राज्यातील विविध ठिकाणांहून आलेल्या उमेदवारांनीही ‘मोहन जोशी पॅनल’ला आपला पाठिंबा असल्याचे जाहिर केले.

‘मोहन जोशी पॅनल’च्या वतीने डॅा. अमोल कोल्हे, दीपक करंजीकर, सुशांत शेलार, विजय कदम, सविता मालपेकर, चारुशीला वाच्छानी, विजय गोखले, दिलीप दळवी, शकुंतला नरे, अॅड. देवेंद्र यादव, विजय सुर्यवंशी हे ११ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. नाट्य परिषदेने हाती घेतलेले परंतु वेळेअभावी अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करून भविष्यात नव्या जोमाने रंगभूमीची सेवा करण्यासाठी ‘मोहन जोशी पॅनल’ला विजयी करण्याचे आवाहन यावेळी सर्व उमेदवारांनी केले.

Check Also

ऑपरेशन सूरत-२ इंदौरमध्येही भाजपाकडून असाच प्रयोग

लोकसभा निवडणूका जाहिर होताच भाजपाने ४०० पारचा नारा दिला. मात्र लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या दोन टप्प्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *