Breaking News

आमदार परिचारकांना बडतर्फ करण्याच्या मागणीवरून कामकाज तहकूब शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सभागृहात घोषणाबाजी

मुंबई : प्रतिनिधी

सैन्यातील कुटुंबियांच्या विरोधात अपशब्द वापरून अपमान करणाऱ्या भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारकांना बडतर्फ करण्याच्या मागणीवरून शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत सभागृहाचे कामकाज दोनवेळा बंद पाडले. तर शिवसेनेच्या या मागणीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने सभागृहात पाठिंबा दिला. त्यामुळे विधानसभेचे कामकाज तहकूब करावे लागले.

विधानसभेचे कामकाज सुरु होताच शिवसेनेचे गटनेते तथा मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी विधान परिषदेतील आमदार प्रशांत परिचारक यांनीा सैनिकांच्या कुटुंबियांचा अपमान करणारे वक्तव्य केले. त्यांचे वक्तव्य हे देशद्रोहाच्या आरोपापेक्षा भयंकर असल्याने त्यांना बडतर्फ करण्याची मागणी केली. त्याचवेळी शिवसेनेच्या सर्व सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येत आमदार परिचारक यांच्या विरोधात घोषणा बाजी करत आमदार पदावरून बडतर्फ करण्याची घोषणा देण्यास सुरुवात केली. तसेच परिचारकांच्या विरोधातील फलकही फडकाविला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज चालविणे अशक्य झाल्याने अखेर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहाचे कामकाज १५ मिनिटासाठी तहकूब केले.

सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर शिवसेनेचे सर्व सदस्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत धाव घेत पुन्हा परिचारकांच्या विरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यातच भाजपच्या सदस्यांनी मोकळ्या जागेकडे धाव घेत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना निलंबित करण्याची घोषणा देत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शिवसेनेच्या सदस्यांना जागेवर जाण्याची सूचना केली. मात्र शिवसेनेच्या सदस्यांननी घोषणाबाजी तशीच सुरु ठेवली. त्यातच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी परिचारक यांना बडतर्फ करण्याची मागणी करत त्यांचा अपराध मोठा असल्याचा आरोप केला. तसेच त्यांना आमदार पदी ठेवण्यात काहीही हाशील नसल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनीही परिचारक यांचे वक्तव्य हे सैनिकांचा अपमान करणारे असल्याने त्यांना बडतर्फ करण्याची मागणी केली. त्यावेळी अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी परिचारक हे विधानसभेचे सदस्य नाहीत. त्यामुळे त्याविषयी या सभागृहात चर्चा करता येणार नसल्याची बाब नजरेसमोर आणून देण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी परिचारक यांनी केलेल्या वक्तव्याची चौकशी करण्यासाठी विधान परिषदेने सर्व पक्षिय समिती स्थापन केली होती. त्यात शिवसेनेच्या अँड.नीलम गोऱ्हे, तेव्हांचे काँग्रेसचे नेते नारायण राणे आणि राष्ट्रवादीचे आमदारांचाही समावेश होता. त्यांनी दिलेल्या अहवालानुसारच परिचारक यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यावर राजकारण करता येणार असून या ठरावावर किमान एक वर्षे कोणतीही दुरूस्ती करता येणे शक्य नसल्याचे त्यांनी गोंधळातच सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. तरीही शिवसेनेचे सदस्यांनी तरीही गोंधळ तसाच सुरू ठेवल्याने अखेर अध्यक्ष बागडे यांनी सभागृहाचे कामकाज अर्धातासासाठी पुन्हा तहकूब केले.

पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या आमदार अँड. गोऱ्हे यांच्या नावाचा उल्लेख केला. मात्र त्या विधानसभेच्या सदस्या नाहीत. त्यामुळे त्यांचे नाव कामकाजातून काढण्याची मागणी शिवसेनेच्या सुनिल प्रभू यांनी केली. त्यानुसार त्यांचे नाव सभागृहाच्या पटलावरून काढून टाकण्यात येत असल्याचे विधानसभा अध्यक्ष बागडे यांनी जाहीर केले.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *