Breaking News

छगन भुजबळ म्हणाले, राज ठाकरेची अवस्था, पिंजरा सिनेमा मधील मास्तर सारखी धार्मिक द्वेषाचे राजकारण करू पाहणाऱ्यांना आता हे समजायला हवं हा फुले-शाहु-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे-छगन भुजबळ

धार्मिक द्वेषाचे राजकारण करू पाहणाऱ्यांना आता हे समजायला हवं हा फुले-शाहु-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. इथे जातीयवादाला थारा नाही असे प्रतिपादन करत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे  आज कोल्हापूर येथील राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निरोपावेळी विरोधकांवर कडाडले.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी “परिवार संवाद यात्रेच्या” माध्यमातून जयंत पाटील आणि सहकारी यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला पक्षाचा केंद्रबिंदु असलेल्या कार्यकर्त्यांशी म्हणजेच आपल्या परिवाराशी संवाद साधत आहेत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. कोरोना काळातील काही महिने सोडले तर सातत्याने राष्ट्रवादी आपल्या परिवाराशी संवाद साधला आहे.

संकटाच्या काळात राज्य सरकारने देशातल्या इतर राज्यापेक्षा उत्तम काम करुन दाखविले. आरोग्य, गृह या विभागानंतर अन्न नागरी पुरवठा विभागाने मोठी जबाबदारी पार पाडलीशिवभोजन थाळीच्या माध्यमातुन कोणालाही आम्ही उपाशी पोटी झोपु दिले नाही.

विकासाच्या बाबतीत आम्ही कोणतीच तडजोड केली नाही.

अन्नधान्य प्रत्येक नागरिका पर्यंत पोहचविलं महाविकास आघाडी विकासाचे राजकारण करते. आमचे लक्ष हे फक्त जनतेचे हित एव्हढेच आहे अशी माहिती त्यांनी दिली.

यावेळी बोलताना ते म्हणाले की समतेचा संदेश देणाऱ्या कोल्हापूरमध्ये काही मंडळींनी धार्मिक चिखल करण्याचा प्रयत्न केला होता. पण कोल्हापूरकरांनी तो होऊ न दिला नाही. महाविकास आघाडीवर विश्वास ठेवला आणि कोल्हापुरच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला विजयी केले. शाहू महाराजांच्या कोल्हापूरने पुन्हा एकदा महाराष्ट्राला मार्ग दाखविला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची ६ मे रोजी १०० वी पुण्यतिथी आहे. त्यानिम्मीताने हे वर्ष “कृतज्ञता पर्व” म्हणुन आपण साजरे करणार आहोत कोल्हापुर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकासाठी आवश्यक तो निधी आम्ही उपलब्ध करुन देऊच.धर्मांध सत्तेच्या विरोधात उभे राहण्याची ताकद फुले-शाहु-आंबेडकरांचे विचाराच देतात असे ठाम मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

देशात महागाई ही वाढती आहे, बेरोजगारी, गॅसचे दर, पेट्रोलचे दर, अर्थव्यवस्थेची लावलेली वाट, कोळसा संकट, खाद्यतेलाचे दर वाढले आहे, घरघुती गॅस प्रचंड महाग झाला आहे. जेंव्हा केंद्रात आघाडी सरकार होते तेंव्हा महगाईचा दर हा ४.७ % टक्के होता. आज हा दर १४.५५ % टक्के एव्हढा वाढल्याचे त्यांनी सांगितले.

तुमच्या घरात तुम्हाला रोज लागणाऱ्या सगळ्या वस्तुंच्या किमती ह्या २०० ते ३०० टक्क्यांनी वाढल्या आहेत. अशी माहिती त्यांनी उपस्थितांना दिली त्याचबरोबर महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचे प्रयत्न कसे केले जात आहेत. महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळवून नेण्याचे प्रयत्न कसे केले जात आहे याची यादीच त्यांनी वाचवून दाखवली असे मुद्दे तुमच्यासमोर येऊ नये यासाठीच भोंग्यांच राजकारण केले जात आहे. पण यावर आपण बोलाचय नाही आणि यांना धार्मिक तेढ निर्माण करु द्यायची असे कसे चालेल आज देशात अतिशय वाईट परिस्थीत निर्माण झाली आहे.असे मत त्यांनी यावेळी मांडले.

भारतात दंगे भडकवण्याचे काम सुरु आहे आणि हे दंगे भारतीय जनता पार्टी घडवुन आणत आहेत तुमच लक्ष विचलीत करण्याचे काम सुरु आहे.  ज्यांना भोंगे लावायचेच असतील ना तर त्यांनी ते पेट्रोल पंपावर लावावे सर्वांना रोजची भाववाढ तरी कळेल असे मत त्यांनी व्यक्त केले.

केंद्राच्या विरोधात जे बोलतील त्यांचा आवाज दाबण्याचा प्रकार सुरु आहे. देशात घडणाऱ्या सत्यपरिस्थीतीवर बोलले तर भाजपाच्या यंत्रणा कामला लागतात मग घरी ED, CBI सारख्या ह्या यंत्रणा येऊन पोहचतात. त्यामुळे भाजपाने फर्मान सोडले की लगेच कारवाई…राजकारणातील लढाई जनतेच्या कोर्टात लढायची असते परंतु भाजप शिखंडीसारखा केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करत आहे. ईडीने कारवाई केल्यानंतर जामिन लवकर मिळत नाही. मालमत्तेवरील जप्ती लवकर मुक्त होत नाही आणि वर्षानुवर्षे केस बंद होत नाही. विशेष म्हणजे अशाप्रकारच्या कारवाया या फक्त भाजप सोडून इतर पक्षातील नेत्यांवरच होत आहेत याचा अर्थ भाजपमधील नेते सूचिर्भूत आहेत का…? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, काही दिवसांपुर्वी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर आणि पवार साहेबांवर टीका केली मात्र हेच राज ठाकरे काही दिवसांपुर्वी सतत भाजपा विरोधी बोलत होते. राज ठाकरेची अवस्था, पिंजरा सिनेमा मधील मास्तर सारखी झाली आहे, ज्या तमाशाला गावातून बाहेर काढायचं होतं, त्याच तमाशात तुणतुणे वाजवायची पाळी आली आहे. हिंदु विरुद्ध मुस्लिम असे वातावरण तयार केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत किती मुस्लिम मावळे होते याची यादीच त्यांनी यावेळी वाचवून दाखवली.

इस्लामपुरच्या सभेतील अमोल मिटकरी यांच्या भाषणावरुन मोठा वाद निर्माण केला जात आहे. १०० वर्षांपूर्वी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी एक तोडगा सुचवला होता. पौरोहित्य हा एक व्यवसाय आहे.पोटापाण्याचा रोजगार आहे.तो सर्व हिंदूंना खुला असावा. म्हणजे जसे वकील,सीए, डॉक्टर, प्राध्यापक, न्यायाधीश परीक्षा देऊन होता येते तशीच विद्यापीठीय परीक्षा पास करून कोणाही हिंदूला पुरोहित बनता आले पाहिजे. मराठा, कुणबी, तेली,आगरी, भंडारी, धनगर, गुरव, मातंग, चर्मकार, कैकाडी, वडार आदी सर्व ४६३५ हिंदू जातींना पुरोहित बनण्यासाठी दरवाजे खुले करून द्यावेत असेही ते म्हणाले.

आघाडी सरकार असताना मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या कंपन्या विकण्याचे काम सुरु आहे.  हे सगळं विकुन देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयनची कशी होणार….? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर ओबीसीचा निर्माण झालेला प्रश्न सोडविल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *