Breaking News

महाराष्ट्र सदनाचा उल्लेख करत शरद पवार म्हणाले, शून्यातून उभे राहिलेले नेतृत्व

दिल्लीतील सर्वात उत्तम निवासस्थान हे महाराष्ट्र सदन आहे. दिल्लीच्या सौंदर्यात भर घालणारे हे महाराष्ट्र सदनाचे काम छगन भुजबळ यांनी केलं असचं काम त्यांनी महाराष्ट्र, मुंबई तसेच नाशिक जिल्ह्यात उभं केलं. कुठल्याही कामचा निश्चय केल्यानंतर ते त्यात झोकून काम करणे हा भुजबळांचा गुण आहे. भुजबळ याचं नेतृत्व शून्यातून उभे राहिलेले नेतृत्व आहे. त्यांनी अनेक खस्ता खाल्या. शिवसेनेचे नेतृत्व, नगरसेवक, पहिले आमदार, महापौर होत मुंबईचे नेतृत्व त्यांनी केले. पायाभूत विकास केला. पुढे विधानसभा, विरोधी पक्ष नेता, मंत्री म्हणून काम करताना विकासाला दिशा देण्याचे आगळे वेगळे काम केले. देशात विकास करणारा उत्तम राजकारणी नेते म्हणून भुजबळांचा उल्लेख करावा लागेल या शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी छगन भुजबळ यांचा गौरव केला.

छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त छगन भुजबळ गौरव समितीच्या वतीने मुंबईतील ‘षण्मुखानंद’ सभागृहात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार हे बोलत होते. यावेळी छगन भुजबळ यांच्या जीवनावर आधारित ‘बहुजनांचा नायक छगन भुजबळ’’ व फोटोबायग्राफीचे पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, जम्मू अँड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष खा.डॉ.फारुख अब्दुल्ला, माजी राज्यसभा सदस्य प्रज्ञावंत साहित्यिक डॉ.जावेद अख्तर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह, गौरव समितीचे खासदार प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार कपिल पाटील, आमदार सचिन अहिर,राजेश टोपे,माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, डीएमकेचे आली शेख मिरान, माजी खासदार राजकुमार सैनी, मोतीलाल साखला, समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, बहुजनांचा नायक छगन भुजबळ’ पुस्तकाचे लेखक ज्येष्ठ पत्रकार हर्षल प्रधान, विजय सामंत प्रकाशक अरविंद शाह यांच्यासह कुटुंबातील सदस्य व देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शरद पवार म्हणाले की, आज अतिशय आनंदाचा क्षण आहे. कारण याच सभागृहात छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची स्थापना करण्यासाठी बैठक पार पडली. त्यानंतर लगेच त्यांच्याच अध्यक्षतेखाली शिवाजी पार्कवर मेळावा देखील पार पडला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वाटचालीत त्यांचे योगदान हे अतिशय महत्वाचे आहे. कोणतेही काम हाती घेतलं की ते उत्तम व नेटकं करायचे ही छगन भुजबळ यांची खासियत या शब्दात त्यांनी भुजबळांच्या कार्यशैलीचे कौतुक केले.

ते म्हणाले की, छगन भुजबळ हे माझे ज्येष्ठ सहकारी असून त्यांची ६१ वी व आता अमृत महोत्सला उपस्थित आहे. मी त्यांच्या कायम पाठिशी आहे. देशात सावित्रीबाई, महात्मा फुले यांचे विचार पुढे नेण्याचे काम भुजबळ करत आहे. मी ज्या पुणे विद्यापीठात शिक्षण घेतले त्या विद्यापीठाला फुले यांचे नाव भुजबळांमुळे मिळाले याचा आनंद असल्याचे ते म्हणाले. तसेच देशात काश्मीर राहण्यासाठी फारूक अब्दुल्ला यांच्या वडिलांचे योगदान अतिशय महत्वाचे राहिले. देशात एकात्मता टिकविण्यासाठी फारूक अब्दुल्ला यांनी केले. ते आज छगन भुजबळ यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यास उपस्थित राहिले हा आनंदाचा क्षण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सध्या धार्मिकतेच्या नावाखाली देश दुभगला जात आहे – डॉ. फारुक अब्दुल्ला
यावेळी विचारांची लढाई लढणाऱ्या नेत्यांमध्ये भुजबळांचे स्थान आदराचे आहे अशी स्तुतीसुमने फारुक अब्दुल्ला यांनी भुजबळ यांच्यावर उधळली.
यावेळी फारुक अब्दुल्ला म्हणाले की, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारत एक आहे. पण सध्या धार्मिकतेच्या नावाखाली देश दुभगला जात आहे. राम फक्त हिंदुचा नाही तर तो सर्वांचा ‍आहे. देशाची एकजुटता धोक्यात आहे. महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ अशा अनेक समस्या आहेत. या संकटातून मार्ग काढावा लागेल. देशात काहीजणांना रावणासारखा मी पणा आल्याची टीका त्यांनी अप्रत्यक्ष केंद्र सरकारवर केली. मी मुस्लिम आहे पण भारतीय मुस्लिम आहे. चीनी नाही. ‘जीना यहा मरना यहा इसके सिवा जाना कहा’ या गीतातून भाईचार्यामचा संदेश देत लोकांच ऐक्यच देशाला वाचवेल असा संदेश देत त्यांनी छगन भुजबळांना शुभेच्छा दिल्या.

देशाला हजारो वर्षापासून लाभलेली सुसंस्कृत परंपरा कायम रहायला हवी – साहित्यिक डॉ.जावेद अख्तर
यावेळी डॉ.जावेद अख्तर म्हणाले की, आम्ही सांगतो तेच खरे असे जिथे सांगितले जाते तिथे लोकशाही नांदत नाही. आपल्या देशात मात्र लोकशाही अद्याप जिवंत आहे. त्यामागे देशाची विचारधारा आहे. मात्र आज देशात विभिन्नतेत एकता असतांना ती तोडण्याचा प्रयत्न काही शक्तींकडून केला जात आहे. याचा आपल्याला विचार करायला हवा. देशात चुकीच्या गोष्टींबाबत आपण आवाज उठवायला हवा. कारण आपल्या देशाला हजारो वर्षापासून सुसंस्कृत अशी परंपरा लाभलेली आहे. ती कायम राहिला हवी यासाठी सर्वांनी एकत्रित राहायला हवे असे सांगत छगन भुजबळ यांच्या विविध आठवणीना उजाळा त्यांनी दिला.

भुजबळ लढाऊवृत्ती असेलेलं संकटांना न डगमगणारं नेतृत्व – अजित पवार
यावेळी अजित पवार म्हणाले की, छगन भुजबळ यांचा मी चाहता असून नेता बहुजनांचा नेता बहुगुणांचा असा छगन भुजबळ यांचा परिचय आहे. १९८६ मध्ये भुजबळ साहेब दुबईचा व्यापारी इकबाल शेखच्या वेशात बेळगाव मध्ये घुसले होते. त्याबद्दल त्यांना अटक देखील झाली नंतर त्यांना जेल देखील झाली. मराठी माणसाचा आवाज सीमा भागामध्ये कमी होणार नाही यासाठी ते काम करत राहिले. आज देखील काही पक्ष संघटना ओबीसी बांधवांच्या करता खोटे गळे काढत आहेत. परंतु ते मगरीच्या अश्रू आहेत. देशात मंडल आयोगाच्या अंमलबजावणीच्या वेळेस राज्यांमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये अतिशय ठोस भूमिका घेण्याचं काम हे भुजबळ साहेबांनी केलं. राज्यात आघाडीचे सरकार वाचविण्यासाठी छगन भुजबळ यांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. नाशिकमध्ये त्यांनी केलेला विकास, केलेल्या सुधारणा या अतिशय उत्कृष्ट आहे. छगन भुजबळ हे लढाऊवृत्ती संकटांना न डगमगणार संकटावर मात करणारे नेतृत्व आहे.
ते म्हणाले की, एखाद्या गोष्टीत लक्ष घालून जीव ओतून काम करणे हा छगन भुजबळ यांचा स्वभाव आहे. ओबीसी बांधवांच्या आरक्षणाच्या हक्कासाठी स्वतःची राजकीय कारकीर्द आणि जीवन धोक्यात टाकण्याची जोखीम त्यांनी पत्करलेली होती. याची नोंद या निमित्ताने आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. १० जून १९९९ ला ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. त्याच्यानंतर खरंतर लगेच निवडणुका झाल्या. सहा महिने आधी निवडणुका घेतल्या. भुजबळ साहेबांनी आणि बाकीच्या सगळ्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. त्यानंतर आघाडीची सत्ता आली त्यात त्यांनी उपमुख्यमंत्रीपद त्यांनी भूषविले. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या तोडीस तोड काम करून दाखवलं. दिल्लीत त्यांनी महाराष्ट्र सदन उभारलं. हे देशातील अतिशय उत्कृष्ट सदन आहे. यासाठी एकही पैसा दिला नसतांना नाहक बदनामी करण्यात आली. देशात एखाद्याची प्रतिमा मलिन करण्याचे घाणेरडे राजकारण काही जण करतात. त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे असे त्यांनी सांगितले.

छगन भुजबळ हे वादळ, देशात पुन्हा एकदा मशाल पेटविण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होईल – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, भुजबळ यांना विधानभवनात १९८५ साली पाहण्याचा योग आला. त्यांची सभागृहात एंट्री वादळी होती. त्यांनी विविध प्रश्नावर सभागृह गाजवत स्वत:चा वेगळा ठसा उमटवला. त्यावेळी सभागृहात राम नाईक, दत्ता पाटिल, मृणाल गोरे असे अनेक तरुण आक्रमक चेहरे होते. पण भुजबळ त्यात वेगळे होते. १९९२ ला ते कॉंग्रेसमधे आले. १९९५ ला ते विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते होते. त्यावेळी भुजबळ नावाच वादळ पहायला मिळाले. सरकारला धारेवर धरणारे भुजबळ सर्वत्र गाजले. १९९९ ला दोन्ही कॉंग्रेगसची सत्ता येण्यास जे प्रमुख वक्ते होते. त्यात भुजबळ हे अग्रभागी होते. सत्ता येण्यास वरचा क्रमांक भुजबळांचा होता. त्यावेळेस दोन्ही कॉंग्रेसची आघाडी व्हावी यासाठी त्यांचा मोठा वाटा होता असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, काही नेते पुरोगामी होते. पण प्रत्यक्ष राजकारणात हे विचार त्यांना पुढे नेत वाटचाल करणे जमले नाही. म्हणून ते संपले. पण भुजबळांनी पुरोगामी विचार व राजकारणात प्रॅक्टिकली अंमलात आणत वाटचाल केली. या दोन्ही बाबींचा त्यांनी सुंदर मिलाफ घातला. २००३ मध्ये आघाडी सरकार टिकवण्यात भुजबळांचा मोठा वाटा होता. समीर भुजबळ यांचीही साथ मिळाली. विलासराव देशमुख नेहमी म्हणायचे सरकार भुजबळांमुळे टिकले असे सांगायचे. आता देशात लोकशाही व संविधान धोक्यात आहे. पुन्हा एकदा मशाल पेटवण्याचे काम भुजबळांना करायचे आहे. मशाल पेटवायला हात आहे व हातावर घड्याळ आहे, असे सांगत देश वाचवायचे काम पुन्हा तुम्हाला करायचे असे आवाहन केले.

छगन भुजबळ केवळ ओबीसी नव्हे तर दिनदलित वंचितांच्या हितासाठी लढणारे संघर्ष योद्धा – खा.प्रफुल्ल पटेल
यावेळी प्रफुल्ल पटेल म्हणाले की, महाराष्ट्रासह देशातील दिनदलित वंचित व उपेक्षितांचे नेते व शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर काम करणारे छगन भुजबळ हे संघर्ष योध्दा आहेत. केवळ ओबीसींच नव्हे तर प्रत्येक समाजासाठी लढणारा योध्दा अशी भुजबळांची ओळख आहे. त्यांच्या ६१ चा सोहळा मुंबईतील शिवाजी पार्कवर मोठ्या जनसमुदायासमोर झाला होता. आज छगन भुजबळांचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने जमलो आहेत पुढे आपण त्यांची शंभरही साजरी करु असे त्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले की, छगन भुजबळ शिवसेनेत असतांना १९८५ साली मशाल चिन्हावर पहिले आमदार म्हणून निवडून आले होते. त्याचवर्षी नगरसेवक व मुंबईचे महापौर निवडले गेले होते. भुजबळांचा राजकीय प्रवास अतिशय मोठा आहे. त्यांचा शतकमहोत्सवही कार्यक्रम देखील आपण साजरा करु, त्यावेळी देखील मीच समन्वयक राहिल, असे सांगत त्यांनी छगन भुजबळांना ७५ वर्षपूर्ण केल्याबद्दल व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमदार कपिल पाटील व आभार प्रदर्शन आमदार सचिन आहिर यांनी केले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *