Breaking News

विद्यार्थ्यांना भडकावून त्यांच्या भवितव्याशी खेळू नका विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवणाऱ्यांवर कडक कारवाई करा-नाना पटोले

मराठी ई-बातम्या टीम

दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात या मागणीसाठी मुंबई, नागपूर, औरंगाबाद व उस्मानाबाद मध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवून त्यांच्या भवितव्याशी खेळणे अत्यंत चुकीचे आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी असून त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यावर चर्चा करुन सरकार मार्ग काढेल. परंतु कोणाच्यातरी सांगण्यावरून विद्यार्थ्यांनी चुकीचा मार्ग अवलंबू नये, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

यासंदर्भात बोलताना पटोले पुढे म्हणाले की, कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून शाळा, कॉलेज बंद असली तरी शिक्षणात खंड पडू नये व विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून मविआ सरकारने ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरुच ठेवलेले आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्यसुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून त्या पूर्ववत सुरु कराव्यात तसेच परीक्षा ऑफलाईन घ्याव्यात अशी मागणीही मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. सर्व बाजूंनी विचार करूनच सरकारने निर्णय घेतलेला आहे. विद्यार्थी व पालक यांना अजूनही काही शंका, समस्या असतील तर त्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाऊ शकतो त्यासाठी विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवणे चुकीचे आहे.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा पुढे करत काही पक्ष राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवून त्यावर राजकारण करणे अयोग्य आहे. कोरोनाची दुसरी लाट असताना एमपीएससीच्या परिक्षेचा मुद्दा घेऊन अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवून काही राजकीय पक्षांनी आंदोलन केले होते. या आंदोलनातून अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागणही झाली होती. विद्यार्थ्यांचे आरोग्य हे सर्वात महत्वाचे आहे. सरकारने शिक्षणासंदर्भात सर्व स्तरातील लोक, विद्यार्थी, पालक, शिक्षणतज्ञ यांची मते विचारात घेतलेली आहेत असे असताना विद्यार्थ्यांच्या आडून राज्यातील वातावरण बिघडवण्याचे काम कोणी करू नये, विद्यार्थ्यांना भडकवू नका, विद्यार्थ्यांनीही अभ्यासावर लक्ष द्यावे. मविआ सरकार विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्याशी मी बोलून मार्ग काढण्याचा प्रयत्न करेन असे  आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

Check Also

शरद पवार यांचा इशारा, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना सरळ करायला एक ते दोन…

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *