Breaking News

अजित पवार यांची खोचक टीका, मुख्य सचिवांना अधिकार द्या अन् दोघेबी घरी बसा मग बाकीच्यांनी काय तुमच्या तोंडाकडे बघायचं का?

राज्यात सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. मात्र त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यास सातत्याने उशीर होत आहे. यापार्श्वभूमीवर मंत्र्यांना असलेले काही अधिकार विभागाच्या सचिवांना देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या मुद्यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. अजित पवार म्हणाले, जिल्हा परिषदेचे सगळे अधिकार मुख्याधिकाऱ्यांना, महापालिकेचे अधिकार आयुक्तांना, जिल्ह्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना, तालुक्याचे अधिकार बीडीओंना अन् मंत्र्यांचे अधिकार सचिवांना. आता तुम्ही दोघंबी तुमचे अधिकार राज्याच्या मुख्य सचिवांना द्या अन् दोघे पण घरी बसा अशी खोचक टीका केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार हे पुण्यात आले असता ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली.

अरे हे चाललय काय? राज्यात तुम्ही लोकशाही पध्दतीने निवडूण आलात असे वाटतय तर करा ना राज्य कारभार. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार का करत नाही? असा सवाल करत ते पुढे म्हणाले, मला माहित आहे जोपर्यत तुम्हाला दिल्लीचा ग्रीन सिग्नल मिळत नाही. तो पर्यत काहीही होणार नसल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

महिनाभर झाला आपल्याला पालकमंत्री नाही, मंत्रिमंडळचा विस्तार नाही. प्रत्येकवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांना माध्यमांकडून याबाबत विचारलं जातं, तेव्हा फक्त लवकरच….लवकरच.. एवढेच शब्द त्यांच्या तोंडून निघतात. होईल…, होईल… अरे पण कधी होईल? असा खोचक सवालही त्यांनी यावेळी केला.

एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत एवढे प्रश्न निर्माण होतात. अतिवृष्ट होती, विविध संकटं येतात, वेगवेगळ्या घटना घडतात, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. आता प्रवेश सुरू झाले आहेत, त्या संदर्भात पालकांसमोर काही अडचणी आहेत. विद्यार्थ्यांसमोर काही प्रश्न आहेत. निर्णय घेणार कोण? आम्ही दोघे आहोत…, आम्ही दोघे आहोत… पण दोघे पुरू शकतात का? याचं तरी आत्मपरीक्षण करा असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना लगावला.

मला त्या दोघांवर टीका करायची नाही. परंतु वस्तूस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. आज ते घडत नाही याचा जबरदस्त फटका आपल्या महाराष्ट्राला बसतोय. याचं पण तारतम्य भान या लोकांना राहिलेलं नाही. आज यांच्या हातात काहीच नाही. दिल्लीतून जेव्हा सिग्नल मिळेल त्यावेळी हे होणार आहे. तोपर्यंत कितीही गप्पा मारल्या तरी यांच्या हातून काहीही घडणार नाही, हे मी स्पष्टपणे तुम्हाला मी सांगतोय. पूर्वीच्या काळात मात्र काँग्रेस आणि शिवसेनेत निर्णय व्हायचे ते महाराष्ट्रात व्हायचे, मुंबईत व्हायचे. दिल्लीत निर्णय होत नव्हते. ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील जी परंपरा महाराजांनी चालू ठेवली होती, त्याला कुठंतरी आता बाजूला सारण्याचं काम होतंय, याची पण नोंद सर्वांनी घेतली पाहिजे असेही ते म्हणाले.

लोकानी निवडून दिलेल्या आमदाराला अधिकार द्यायचे नाही, मंत्री करायचं नाही याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं, दिल्लीवारी केल्याशिवाय मंत्रिमंडळासाठी ग्रीन सिग्नल मिळणार नाही आणि मंत्रिमंडळ अस्तिवात येत नाही, हे स्पष्ट असल्याचेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात आले होते.त्यावेळी ते रात्री १२ नंतर हॉस्पिटलमध्ये गेले होते. हॉस्पिटल बाहेर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. हे योग्य नसून कायद्याच पालन केले पाहिजे. तसेच रात्री १० नंतर माईक बंद असणे गरजेचे आहे. पण यांचा माईक रात्री २ पर्यंत चालू असल्याचं दिसून आलं आहे. पण यांना माईक बंद करायचं ते कळत नाही? अशी टीका करत उध्दव ठाकरे असताना एकनाथ शिंदे शिस्तीने वागायचे, मात्र आता वेगळेच पाहायला मिळत आहेत. कायदे, नियम करणारे राज्यकर्ते नियम मोडत असतील तर… असाही बोलणारा वर्ग असतो असेही ते म्हणाले.

Check Also

तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान

लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रासह देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पाडले. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघातील मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *