Breaking News

अजित पवार यांचा टोला, उटांवरून शेळ्या हाकणाऱ्यांना काय कळणार… वर्धा जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर अजित पवार यांनी लगावला टोला

राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे सध्या अतिवृष्टीग्रस्त भागातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या पाहणीत शेतकऱ्यांच्या बांधावर जावून अजित पवार नुकसानीची पाहणी करत आहेत, त्यांच्याशी चर्चा करत आहेत. त्यामुळे चिडलेल्या भाजपाच्या काही नेत्यांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठविण्यास सुरुवात केली. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, मुंबईत बसून उंटावरून शेळ्या हाकणाऱ्यांना काय कळणार की शेतात काय अडचणी आहेत? असा उपरोधिक टोला लगावत इथे फिल्डवर उतरून बघावं लागतं अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

आमच्या शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. पाऊस सुरू आहे म्हणून शेतकरी इतके दिवस थांबला. पण आता थांबण्याची त्याची तयारी नाही असा इशारा देत ते पुढे म्हणाले, ही बाब मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी लक्षात घेऊन तातडीने मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

आज वर्धा जिल्ह्यातील अतिवृष्टी भागाचा दौरा केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या भागातील परिस्थिती माध्यमांसमोर मांडली.

जिथे जीवीतहानी झाली, तिथे चार लाखांची मदत मिळाली आहे. मात्र जनावरेही मृत्यूमुखी पडली त्याचे पैसे मिळालेले नाहीत. वर्ध्यात अजुनही सर्व पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. त्याशिवाय त्यांना मदतही मिळणार नाही असेही ते म्हणाले.
विदर्भात अनेक ठिकाणी अजूनही पाऊस पडतोय. हवामान खात्याने आणखी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. शेतकरी अडचणीत आहे. अशावेळी शेतकऱ्यांना आणि पूरग्रस्तांना आधी मदत द्या अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना सुनावले.

आज अजित पवार यांनी वर्धा जिल्ह्यातील विविध ठिकाणी पाहणी दौरा केला. यावेळी नुकसानग्रस्त भागातील शेतकरी आणि स्थानिक नागरिकांशी चर्चा केली. वर्धा जिल्ह्यातील आठ तालुके आणि तिथून वाहणाऱ्या नद्या, ओढे यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांचे अतोनात नुकसान झाले आहे. मागील १२ ते १५ दिवस पाऊस असल्यामुळे शेतमजुरांना कामाला जाता आले नाही. त्यामुळे त्यांचे उपजिविकेचे साधन थांबले. या सर्व परिस्थितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांसमोर वस्तुस्थिती मांडणार आहोत. तसेच शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी हरभरा, तुरीचे बियाणे उपलब्ध करुन दिले पाहिजे अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कापूस आणि सोयाबीनची वाढ खुंटली आहे. कापूस आणि सोयाबीन ही या भागातील महत्त्वाची पिके आहेत. त्यामुळे या पिकांना हेक्टरी भरीव मदत देणे गरजेचे आहे. खरीपाच्या पेरणीचा हंगाम आता निघून गेलाय. रब्बीला अजून वेळ आहे. त्यामुळे आता पुन्हा पेरणी केली तर ती धड खरीपात मोडणार नाही आणि धड रब्बीतही मोडणार नाही. त्यामुळे चारही कृषी विद्यापीठे, कृषी आयुक्तांनी, कृषी सचिवांनी आता यात लक्ष घालून शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

Check Also

शरद पवार यांचा इशारा, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना सरळ करायला एक ते दोन…

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *