Breaking News

खेलो इंडियातील सुवर्ण पदक विजेत्यांना १ लाख, रौप्य विजेत्यांना ७५ हजाराचे पारितोषिक

क्रिडा मंत्री विनोद तावडे यांची घोषणा

 मुंबई : प्रतिनिधी

केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित द्वितीय “खेलो इंडिया युथ गेम्स २०१९” मध्ये तब्बल २२७ पदके प्राप्त करून महाराष्ट्र राज्य देशात अव्वल ठरला आहे. खेळाडूंच्या गुणवत्ता उंचावण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्यावतीने सुवर्ण पदक विजेत्यांना एक लाख रूपये, रौप्य पदक विजेत्यांना ७५ हजार तर कास्य पदक विजेत्यांना प्रत्येकी ५० हजार रूपयांचे पारितोषिक जाहीर केल्याची घोषणा आज क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी केली.

“खेलो इंडिया युथ गेम्स २०१९” नुकतेच यशस्विरित्या पुणे येथे पार पडले. राष्ट्रस्तरीय या गेम्समध्ये महाराष्ट्राला ८५ सुवर्ण ६१ रौप्य आणि ८१ कांस्य असे पदके मिळविण्याचा मान मिळाला आहे. या खेळाडूंचा अभिनंदन सोहळा आज आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री तावडे बोलत होते. या कार्यक्रमास अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, क्रीडा विभागाचे आयुक्त सुनिल केंद्रेकर, उपसचिव राजेंद्र पवार आदींसह राज्यभरातून आलेले खेळाडूंचे प्रशिक्षक आणि पालकही उपस्थित होते.

राज्यातील उत्तोमोत्तम खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण आणि अर्थसहाय्य मिळावे यासाठी राज्य शासन नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगत या विजयानंतर खेळाडूंची जबाबदारी आणखीनच वाढली असून, सर्वांच्या अपेक्षाही खेळाडूंकडून वाढल्या आहेत. आगामी आशियाई आणि २०२८ मधील ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचा तिरंगा फडकवण्याचे ध्येय खेळाडूंनी आता ठेवावे, असे आवाहन ही त्यांनी केले.

शालेय शिक्षण घेत असताना या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा विद्यार्थ्यांचा विचार करून, राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य मुक्त मंडळ स्थापन केले असून, खेळांचा सराव करत असताना खेळाडूंना आपले शिक्षणही पूर्ण करता येणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांनाही याचा लाभ घेता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भविष्यात खेळाडूंना अधिक प्रोत्साहन मिळावे आणि गुणवंत आणि उद्योन्मुख खेळाडू देशाला मिळाले यासाठी, तालुका स्तरावर खेळणा-यां विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणात पाच गुण, जिल्हास्तर, राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तरावर खेळणा-या खेळाडूंना अनुक्रमे १०, १५, आणि २० गुण प्रदान करण्यात येणार आहेत. याचबरोबर, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर खेळणा-या खेळाडूंसाठी शासकीत सेवेत सामावून घेण्यासाठी पाच टक्के आरक्षण देण्यात येत असून आंतरराष्ट्रीयस्तरावरील विजेत्या खेळाडूंना थेट शासकीय नोकरीत सामावून घेतले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्र व राज्यशासनाच्या संयुक्त विद्यमाने व्दीतिय खेलो इंडिया युथ गेम्स, २०१९ शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे व मुंबई येथे ८ ते २० जानेवारी २०१९ या कालावधीत आयोजन करण्यात आले या स्पर्धेत देशातून ७५०० खेळाडू, १५०० तांत्रिक अधिकारी व स्वयंसेवक, संयोजन समिती, वैद्यकीय व सुरक्षा इ. साठी सुमारे १००० अधिकारी व कर्मचारी सहभागी झालेले होते.

खेलो इंडिया युथ गेम्स क्रीडा बाबी- जिम्नॅस्टिक्स, वेटलिफ्टिंग, ज्युदो, कुस्ती, बॅडमिंटन, ॲथलेटिक्स, शुटींग, फुटबॉल, हॉकी, खो-खो, जलतरण, बॉक्सींग, कबड्डी, लॉन टेनिस, व्हॅालीबॉल, बास्केटबॉल, टेबल टेनिस, आर्चरी अशा १८ खेळांच्या क्रीडा स्पर्धा १७ ते २१ वर्षाखालील मुले व मुली यांच्या आयोजित करण्यात आले होते.

खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या पथकामध्ये ७७२ खेळाडू व १५६ क्रीडा मार्गदर्शक तसेच व्यवस्थापक व चिफ दि मिशन असे एकूण ९२८ सहभागी झालेले होते.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *