Breaking News

भाजपाने ६ मुख्यमंत्री, ७ खासदार, शेकडो नेते उतरवूनही हाती पराभव, मात्र आपची विजयी घौडदौड दिल्ली महापालिकेत आम आदमी पक्षाला १३४ तर भाजपाला १०४ जागा

मागील काही वर्षात भाजपाकडून प्रत्येक निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात येत आहे. त्यानुसार मागील १५ वर्षापासून हाती राखलेल्या दिल्ली महापालिकेची निवडणूकही भाजपाने प्रतिष्ठीत करत भाजपाशासित ६ राज्यांचे मुख्यमंत्री, ७ खासदार आणि शेकडो पदाधिकारी दिल्ली महापालिकेच्या निवडणूकीत उतरविले. मात्र आप अर्थात आम आदमी पार्टीने आपल्या कामाच्या आणि प्रचाराच्या जोरावर भाजपाला १०४ जागांवर रोखत १३४ ठिकाणी विजय मिळवित दिल्ली महापालिकेची सत्ता काबीज केली.

भाजपाकडून दिल्ली महापालिकेवर सलग चौथ्यांदा सत्ता काबीज करण्यासाठी भाजपाने डझनहून अधिक केंद्रीय मंत्री, भाजपाशासित राज्यांचे ६ मुख्यमंत्री, ७ खासदार, शंभराहून अधिक पदाधिकारी असा फौजफाटा प्रचारात उतरवला होता. तरीही, भाजपला दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत पराभवाची नामुष्की सहन करावी लागली. मतदानोत्तर चाचण्यांमधील अंदाजाप्रमाणे आम आदमी पक्षाला (आप) एकतर्फी यश मिळाले नसले तरी, २५० जागांच्या दिल्ली महापालिकेत ‘आप’ने बहुमताचा आकडा पार केला आहे. ‘आप’ला महापालिकेत सत्ता मिळू न देण्यासाठी भाजपाने जागोजागी टाकलेले अडथळे फोल ठरले.

हैदराबाद आणि बृहन्मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीरसभा आयोजित केलेली होती, तशी प्रचारसभा दिल्लीत झाली नाही. पण, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा वॉर्डा-वॉर्डात-घराघरात जाऊन मतांचा जोगवा मागत होते. नड्डांसह केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह, पीयुष गोयल, हरदीप पुरी, मीनाक्षी लेखी, अनुराग ठाकूर, ज्योतिरादित्य शिंदे, नितीन गडकरी, भागवत कराड असे सुमारे दीड डझन मंत्री प्रचारात उतरले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही दिल्लीत प्रचार केला होता.

दिल्ली पालिकेत भाजपाच्या १५ वर्षांच्या सत्तेला ‘आप’ने सुरुंग लावला आहे. दिल्लीत विधानसभेनंतर महापालिकेवरही अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाची सत्ता स्थापन होईल. त्यामुळे दिल्ली पालिकेत आता ‘आप’चा महापौर बसणार आहे.

दिल्ली पालिका निवडणुकीत २५० जागांसाठी लढत झाली. त्यामध्ये ‘आप’ला १३४ जागा, भाजपाला १०४, काँग्रेस ९ आणि अपक्ष ३ असे उमेदवार निवडून आले. १३४ जागा जिंकत ‘आप’ने दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर ‘आप’चे खासदार राघव चड्डा यांनी भाजपाला खोचक टोला लगावला आहे. देशातील सर्वात छोट्या पक्षाने जगातील सर्वात मोठ्या पक्षाला हरवले असल्याचा टोला लगावला.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसात सहा सभा

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात येत्या दोन दिवसांत २९ व ३० एप्रिल रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *