Breaking News

अबू आझमी यांची घोषणा, मी वंदे मातरम् म्हणणार नाही; विधानसभेत गदारोळ १० मिनिटासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब

विधिमंडळात मागील दोन दिवसात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात आणलेला अपात्रतेचा मुद्दा आणि किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओचा मुद्यावरून सभागृहात राजकिय खडाजंगी रंगली. त्यानंतर आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेत समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी मी वंदे मातरम् म्हणणार नाही असे वक्तव्य केल्याने सत्ताधारी बाकावरील भाजपा शिंदे गटाच्या आमदारांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले.

प्रश्नोत्तराचा संपल्यानंतर सभागृहात औरंगाबाद येथे रामनवमीच्या दिवशी झालेल्या दंगलप्रकरणाचा मुद्दा लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला. त्यावेळी अबू आझमी यांनी औरंगाबादमध्ये मुस्लिम समुदाय रहात असलेल्या ठिकाणी दोन-तीन जण गाडीवर आले आणि त्यांनी देश मे रेहना तो वंदे मातरम् कहना होगा अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे तेथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली.

पुढे बोलताना अबू आझमी म्हणाले की, आम्ही वंदे मातरम् म्हणू शकत नाही असे वक्तव्य केले. त्यावरून भाजपा आणि शिंदे गटाचे सदस्य चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी अबू आझमी यांच्या विरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली.
तरीही अबू आझमी म्हणाले की, आम्ही आमचे डोके फक्त सर्वमान्य अशा अल्लासमोर फक्त झुकवितो. आम्ही त्यांनाच सर्वस्व मानतो. इतकेच काय आम्ही आमच्या आईसमोरही झुकत नाही. त्यामुळे आम्ही वंदे मातरम् म्हणत नाही असे स्पष्टीकरण दिले. तसे असतानाही काही जण येवून अशा पध्दतीच्या घोषणा देतात असा आरोप केला.

अबू आझमी यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी बाकावरील सदस्य चांगलेच आक्रमक होत त्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत एकत्र येत आझमी यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज १० मिनिटासाठी तहकूब केले.

सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना म्हणाले, जगातील कोणताही धर्म हा आपल्या आईसमोर झुकू नका असे सांगत नाही. त्यामुळे तुम्हीही अशा पध्दतीची वक्तव्य करून लाखो लोकांच्या भावनांना हात घालू नका. वंदे मातरम् हे काही पुजा-अर्चनासाठी नाही. तर देशाच्या राज्यघटनेने त्याला राष्ट्रगाण म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे तुम्हीही अशा पध्दतीचे चुकीचे इंतरप्रिटेशन करू नका असे सांगत राज्यघटनेला माननारे असल्यानेच तुम्ही-आम्ही या सभागृहात आहोत याची आठवणही करून दिली.

जितेंद्र आव्हाड यांनी सर्वोच्च न्यायालयाने हेट स्पीचप्रकरणी दिलेल्या निकालासंदर्भात राज्य सरकारने काय काळजी घेतली असा सवाल उपस्थित केला. त्यास गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेटस्पीच विरोधात ठोस पावले आपण उचलली आहेत. ज्या व्यक्तींवर याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते पुन्हा महाराष्ट्रात भाषण करण्यासाठी कुठे जात असतील तर त्या व्यक्तींना पोलिसांकडून पुन्हा नोटीसा पाठविण्यात येत आहेत. तसेच त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांची माहितीही त्यांना देण्यात येत आहे. तसेच याची सर्व माहिती आपण सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. त्यामुळे न्यायालयाने आपल्यावर कोणतीही टीपण्णी केली नसल्याची आठवण करून दिली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *