Breaking News

ग्रामपंचायत निवडणूक निकालात काँग्रेस, भाजपाकडून नंबर वनचे दावे ९०० पेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा विजय; महाविकास आघाडीच पहिल्या नंबरवर

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने ९०० पेक्षा जास्त ठिकाणी विजय मिळवला असून महाविकास आघाडीच राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय जनता पक्षाचे विजयाचे दावे खोटारडे आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्षाच्या जिल्ह्यातही भाजपाचा दारूण पराभव झाला असून गावखेड्यातील लोकांनी भारतीय जनता पक्ष व शिंदे गटाला सपशेल नाकारले आहे, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रीया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेस व मित्र पक्षाने दमदार कामगिरी केली असून गावातील लोकांनीही काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीवर विश्वास व्यक्त करत विजयावर शिक्कामोर्तब केले आहे. भाजपा व शिंदे गटाची गावात इज्जत राहिली नाही, लोकांमध्ये इज्जत राहिली नाही. महाविकास आघाडीच्या विजयाची धास्ती घेऊन भाजपा व शिंदे गट विधानभवनच्या पायऱ्यांवर आंदोलनाचा थयथाट करत आहेत.
ग्रामीण भागात काँग्रेसची पाळेमुळे आजही घट्ट आहेत, जनतेने काँग्रेस पक्षावर दाखवलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवू.

नागपूर जिल्ह्यात २३६ पैकी २०० ग्रामपंचायतींवर काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला असून भाजपला ३६ जागाही मिळाल्या नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नागपूर जिल्ह्यातील फेटरी गावातही काँग्रेसचा विजय झाला आहे. भाजपा विजयाचे खोटे दावे असून दुस-याच्या घरी पोरगा झालातरी भाजपवाले लाडू वाटतात. विधान परिषद निवडणुकापांसून भारतीय जनता पक्षाच्या पराभवाची मालिका सुरू झाली असून नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीनंतर आता ग्रामपंचायतमध्येही पराभव केला आहे. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीतही भाजपाला धूळ चारून काँग्रेसच्या विजयाचा गुलाल उधळू, असेही पटोले म्हणाले.

ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाच नंबर वन
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये २४८२ ग्रामपंचायती जिंकून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी नंबर वन ठरली आहे. या यशाबद्दल आपण कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो आणि मतदारांचे आभार मानतो, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी सांगितले.

ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजपा – बाळासाहेबांची शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा मतदारांनी युतीला कौल दिला आहे. उपलब्ध आकडेवारी ध्यानात घेता भाजपाचा दणदणीत विजय झाल्याचे दिसते. सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला ८४२ ग्रामपंचायतींमध्ये यश मिळाले आहे. आमच्या विरोधी पक्षांच्या एकत्रित संख्येपेक्षा अधिक सरपंच भाजपा – बाळासाहेबांची शिवसेना युतीचे निवडून आले आहेत. सत्तांतरानंतर यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही मतदारांनी युतीला पसंती दिली होती.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *