Breaking News

आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, गुढी पाडव्याला मुख्यमंत्री घेणार “तो” निर्णय निर्बंध आणि मास्क मुक्तीबाबतचा निर्णय गुढी पाढव्याच्या दिवशी

मागील दोन वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्या कारणाने राज्यातील जनता निर्बंधात रहात आहे. मात्र मागील दोन-तीन महिन्यापासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. यापार्श्वभूमीवर राज्यात मास्क मुक्ती आणि निर्बंध मुक्तीचा निर्णय होणार का याबाबत राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहीलेले असताना या विषयी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्वपूर्ण विधान करत गुढी पाडव्याच्या दिवशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून महत्वाची घोषणा होण्याचे संकेत दिले आहेत.
विशेष म्हणजे नुकतीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली. या बैठकीत डॉ. आंबेडकरांची जयंती उत्सहात साजरी करू या असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यामुळे राज्यातील निर्बंधात आणखी शिथिलता देण्याची संकेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले.
त्यातच २ एप्रिल रोजी गुढी पाडवा तर १० एप्रिलला राम नवमी असून त्यानंतर १४ एप्रिल रोजी डॉ. आंबेडकरांची जयंती असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या निर्बंधांविषयी राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान त्यांनी सर्व नियम पाळून आणि काळजी घेऊन सण साजरे करण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचे स्पष्ट करत परदेशातली परिस्थिती आणि देशातली, राज्यातली परिस्थिती लक्षात घेऊन मास्कमुक्तीचं काय होणार, यावरही टोपे यांनी भाष्य केले.
यावेळी माध्यमांशी बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, मास्कमुक्ती करण्याचे धारिष्ट्य सध्या करणार नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा. परदेशातली परिस्थिती पाहता मास्क वापरणे गरजेचे आहे. नागरिकांनी लस घ्यावी म्हणून निर्बंध लावण्यात आले होते. पण आता एक मास्कचा नियम सोडला तर आपण बऱ्यापैकी नियमांचं शिथिलीकरण केलेले आहे. सार्वजनिक वाहतुकीला गर्दी दिसून येते.
परदेशातली चौथी लाट आणि कोरोना परिस्थितीबद्दल बोलताना टोपे म्हणाले, काही महत्त्वाच्या देशात चौथी लाट पाहायला मिळत असतानाही आपण निर्बंध लादलेले नाहीत, किंबहुना विमानप्रवासावरही निर्बंध नाहीत. त्यामुळे ज्या जुजबी गोष्टी राहिल्या आहेत जसे की लसीकरण, तर ते करून घ्यावे. या चांगल्या उदात्त हेतूने आत्ता जे काही जुजबी निर्बंध आहेत ते आहेत. या संदर्भात थोडा धीर धरण्याची आवश्यकता आहे. देशाचे जगाचे चित्र लक्षात घेऊन, देशाकडून आलेल्या सूचनेनुसार पुढील निर्णय घेता येणार असल्याचे सांगत गुढी पाडव्याच्या दिवशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे निर्बंधाबाबत निर्णय जाहीर करतील असेही त्यांनी सांगितले.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *