Breaking News

डॉक्टर्स देणार नसाल तर समारंभ पूर्वक दवाखान्याला कुलूप लावण्यास वेळ द्या एकनाथ खडसेंची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांवर आगपाखड

मुंबई : प्रतिनिधी

प्रत्येक अधिवेशनात आरोग्याच्या मुद्यावर  प्रश्न मांडून झाले आहेत ,मात्र दवाखान्यात डॉक्टर्सच्या जागा भरल्या जात नाहीत. जर डॉक्टर्स उपलब्ध नसतील तर सरकारने समारंभ पूर्वक दवाखान्याला कुलूप लावण्यासाठी वेळ तरी द्या असा संताप भाजपचे आमदार माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी करत ड़ॉक्टरांची नियुक्तीचे कामही आता वैद्यकीय विभागाकडे वर्ग केल्याचे सांगण्यात येत असून आता आम्हालाही कुठे तरी ट्रान्सफर करा असा उपरोधिक टोलाही त्यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरिष महाजन यांचे थेट नाव न घेता लगावला.

विधानसभेत अर्थसंकल्पातील विभागवार अनुदानाच्या मागण्यांवर ते बोलत होते. त्यावेळी सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्यावर चांगलीच टीका केली.

जळगाव आणि मुक्ताईनगर इथे प्राथमिक आरोग्य केंद्रात गेली अनेक वर्ष वैद्यकीय  अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत . यासंदर्भात आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांच्यासोबत अनेक बैठक झाल्या. फोन वरही चर्चा झाली त्यांनी साकारातमक आश्वासन अनेक वेळा दिले. पण रिक्त पदे भरली गेली नाहीत. ग्रामीण भागात सरकारला एमबीबीएस डॉक्टर्स मिळत नसतील तर बीएएमएस डॉक्टर्स तरी रुजू करून घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करावीत असा उपरोधिक सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

राज्यात आरोग्य सेवांचा बोजवारा उडालेला आहे . गेल्या आठवड्यात मुक्ताईनगरच्या रुग्णाला जेजे रुग्णालयात अँडमिट करून घेण्यात आले नाही. हॉस्पिटल्स मध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे कारण देण्यात आले. मात्र काही वेळातच त्या महिलेचा मृत्यू झाला, याला जबाबदार कोण ? असा सवाल करत त्यांनी आरोग्यमंत्री व वैद्यकिय शिक्षण मंत्र्यांना लक्ष्य केले.

केवळ लाखो लोकांच्या आरोग्याची शिबिरे घेऊन चालणार नाही. तर ग्रामीण भागातल्या लोकांना चांगल्या सुविधाही द्याव्या लागतील असे म्हणत त्यांनी महाजन यांना टोमणा मारला. सरकारवर टीका करायची म्हणून मी बोलत नाही तर सामान्य माणसांच्या प्रश्नावर मी बोलत असल्याचे स्पष्ट करत केवळ आरोग्याचं नाही तर आदिवासीच्या मुद्यावरही त्यांनी सरकारला घेरले. आमदार म्हणून आदिवासी भागात काही कामे करतो. पण त्यांनाही जीएसटीला तोंड द्यावे लागत आहे . त्याचबरोबर पेसा कायद्याची योग्य अंमलबजावणी व्हावी अशी मागणी करत आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कोळी समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली.

 

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *