Breaking News

राज्यातील आदर्श आणि तत्ववादी राजकारण्याला अखेरचा निरोप…. शेकाप नेते गणपत आबा देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कार

मुंबई: विशेष प्रतिनिधी

राज्याच्या राजकारणात तत्ववादी आणि आदर्श राजकारणी म्हणून आणि आपल्या समाजवादी विचारांशी कोणतीही तडतोड न करणारा नेता म्हणून भविष्यात नाव घेतले जाईल ते फक्त गणपत आबा देशमुख यांचे. कधीही पक्षांतर न करता आणि कधीही आपल्या आमदार पदाचा रूबाब किंवा त्याचा गैरवाजवी वापर करताही सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याचे आमदार म्हणून गणपतराव देशमुख हे सतत ११ वेळा निवडूण येत ५५ वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांचे काल रात्री आजारपणामुळे निधन झाले. आज दुपारी त्यांच्यावर शासकिय इतमामात सांगोला येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

महाराष्ट्रात काँग्रेस पक्षानंतर शेतकरी कामगार पक्ष हा सर्वात मोठा पक्ष होता. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांनी शेकापच्या नेत्यांची एक खास बैठक बोलावून घेत सर्वांना काँग्रेस पक्षात येण्याचे आव्हान केले होते. तसेच पक्षात आल्यानंतर काँग्रेसमध्ये मंत्री पदे आणि मानाची पदे देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत शेकापचे अनेक नेते काँग्रेसमध्ये गेले. त्यामुळे पक्षातील प्रस्थापित नेते काँग्रेस मध्ये गेल्याने नवतरूण पुढे आले. यातून गणपत देशमुख यांचाही उदय झाला आणि त्यांना उमेदवारी मिळाली मधला दोन टर्म कालखंडाचा कालावधी वगळला तर सतत ११ वेळा त्यांना सांगोला विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करत आमदार म्हणून निवडूण आले.

गणपत आबांनी आपल्या आमदारकीच्या काळात फार कमी वेळा रेल्वेने प्रवास केला असेल. अन्यथा ते नेहमी एस.टी.ने प्रवास करायचे. सोलापूरहून मुंबईला तर अनेकदा ते एसटी बसनेच यायचे. अतिशय साधे राहणीमान त्यांचे असायचे. पायात साधी पँट आणि अंगात बुश शर्ट असा पेहराव त्यांच्या अंगात असायचा. सोलापूरहून मुंबईला आले की आणि रिकामा वेळ असला की त्यांचा नेहमीचा अड्डा हा फोर्टमधील पीपल्स बुक डेपोत असायचा. तेथे कोणती नवी पुस्तके आलीत, जुन्यामधील काही नव्याने प्रिंट झालेली आहे का? याचा धांडोळा ते अनेकवेळा घेत. या दुकानातून ते अनेकदा ५ ते १० हजार रूपयांची पुस्तके खरेदी करत. तर कधी कधी एखादं पुस्तक चाळता चाळता आवडलं तर त्याचे वाचन या दुकानतच बसून दुकान बंद होईपर्यत करायचे. समाजवादी विचारांच्या पगड्यामुळे त्यांनी नेहमीच साधी राहणी उच्च विचार या तत्वाप्रमाणे राहिले आणि तसेच राहीले. त्यासोबत त्यांनी कधीच तडजोड केली नाही.

नंतर त्यांना डोळ्यांना कमी प्रमाणात दिसायला लागल्यानंतर त्यांच्या सोबतीला एखादा मदतनीस असायचा. तो त्यांना हाताला धरून फोर्टमधील दुकानी घेवून जायचा आणि पुन्हा आमदार निवासातील त्यांच्या खोलीत परत आणायचा. विशेष म्हणजे या संबध प्रवासात त्यांच्याकडे विशेषत: मुंबईत त्यांनी मोटारीने प्रवास केल्याचे किंवा आता साधे नगरसेवक झाले तर बॉऊन्सर घेवून फिरणाऱ्या राजकिय नेत्यांसारखे त्यांनी कधीही आमदार असताना बॉऊन्सर स्वत:च्या अवधी भोवती ठेवले नाहीत, कि कार्यकर्त्यांचे कोंढाळे घेवून फिरले नाहीत. फक्त मतदारसंघाच्या कामासाठीच ते मंत्र्यांना भेटायचे किंवा फोनवरच बोलायचे.

त्यांना कोठेही भेटून कसे आहात आबा असे विचारले की ते तितक्याच साधेपणाने संवाद साधायचे.  मात्र विधानसभेत असल्यानंतर त्यांना एखादा विषय नाही आवडला तर ते त्या विषयाची चिरफाडही तितक्याच आक्रमकपणे करायचे. फडणवीस सरकारच्या काळात विधानसभेत एका विषयावर गंभीरपणे चर्चा सुरु होती. त्यावर मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी उत्तर दिले. परंतु ते गणपत आबांना कायदेशीर चौकटीत योग्य वाटले नाही, त्यामुळे या उत्तराचा निषेध करत त्यांनी सभात्याग केला. त्यांच्या या भूमिकेकडे संपूर्ण सभागृह अवाक् होवून पहात होते. त्यांच्या पाठोपाठ संपूर्ण विरोधकांनी विधानसभेचा सभात्याग केला.

गणपत आबा देशमुख यांनी सांगोला सहकारी सुत गिरणीची स्थापना केली आणि ती  यशस्वीपणे चालवूनही दाखविली. सोलापूर जिल्ह्यातील हि एकमेव सहकारी सुत गिरणी जी नेहमी फायद्यात असायची. सांगोला तालुका तसा सोलापूर जिल्ह्यातील तसा दुष्काळी तालुका, या तालुक्यात पाणी आणून येथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी अविरत प्रयत्न केले. त्यास काहीप्रमाणात यशही आले. त्यामुळे या तालुक्यातील अर्धा भाग हा आता पाण्याखाली आला.

वयाबरोबर शरीर थकल्याने त्यांनी २०१४ साली निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांना अखेर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर शेवटची निवडणूक लढवली. त्यानंतर २०१९ ची निवडणूक त्यांनी लढण्याचे टाळत आता नव्या पिढीने पुढे आले पाहिजे असे सांगत इतरांना संधी दिली. मात्र निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यत कार्यकर्त्यांकडून त्यांना सातत्याने आग्रह केला जात होता. परंतु शेवटी त्यांनी अर्ज भरलाच नाही. गणपत आबांना मुल-बाळ नसल्याने त्यांच्या पुतण्याला वारस म्हणून त्यांनी जाहिर केले असते. मात्र त्यांनी ते कधीच केले नाही. याबाबतचा निर्णय त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांवर सोपविला. अशा या तत्ववादी आणि आदर्श नेत्याला आज शेवटचा निरोप…

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *