Breaking News

कर्नाटकचा निवडणूक रणसंग्राम जाहीरः एप्रिलमध्ये-मे महिन्यात सत्ताधाऱ्यांची परिक्षा आणि निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला कार्यक्रम

मागील काही महिन्यांपासून कर्नाटकातील टीपू सुलतानचा वाद, हिजाब अनिवार्य करण्याचा आणि महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान असलेल्या सीमावादावरून चांगलेच रण माजल्याचे दिसून आले. त्यातच काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या २०१९ सालच्या कोलार येथील एका वक्तव्याप्रकरणी गुजरातमधील सूरत न्यायालयाने सुनावली गेलेली शिक्षा आदी प्रकरणावरून कर्नाटकच्या निवडणूका कधीही जाहिर होऊ शकतात अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने आज कर्नाटक राज्यातील विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या निवडणूक परिक्षेचा कार्यक्रम जाहिर केला असून त्याचा निकाल अर्थात मतदान आणि मतमोजणी मे महिन्यात होऊन निकाल जाहीर होणार आहेत.

कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या वेळापत्रकाची घोषणा आज मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यानुसार १० मे रोजी कर्नाटकमध्ये विधानसभेसाठी मतदान होणार आहे.
कर्नाटक विधानसभेची एकूण सदस्यसंख्या २२४ आहे. त्यासाठी होणाऱ्या मतदान प्रक्रियेमध्ये एकूण ५ कोटी १ लाख मतदार सहभागी होतील. विशेष म्हणजे या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या ८० हून जास्त वयाच्या मतदारांची संख्या तब्बल १२.१५ लाख इतकी असल्याची माहिती केंद्रिय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.

या निवडणुकीत ९ लाख १७ हजार नवमतदार मतदान करणार आहेत. एकूण मतदान केंद्रांची संख्या ५८ हजार २८२ तर प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी ८८३ मतदार मतदान करतील. १३२० मतदान केंद्र पूर्णपणे महिलांकडून सांभाळली जाणार आहेत, अशी माहितीही निवडणूक आयोगाने यावेळी दिली.

निवडणूकीची अधिसूचना- नोटिफिकेशनः १३ एप्रिल

उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख – २० एप्रिल

उमेदवारी अर्ज छाननी – २१ एप्रिल

उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत – २४ एप्रिल

मतदानाची तारीख – १० मे

मतमोजणी आणि निकालाची तारीख – १३ मे

Check Also

इंडोनेशियाच्या शिष्टमंडळाने घेतली लोकसभा निवडणूकीच्या कामकाजाची माहिती

इंडोनेशिया देशाच्या निवडणूक आयोगातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयातील राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला भेट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *