Breaking News

रामदास कदम यांची टीका, उध्दव ठाकरे फक्त दिखाव्यासाठी गेले… औरंगाबादच्या दौऱ्यावरूनव साधला निशाणा

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची हाती आलेली पिके गेल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक आरिष्टाला सामोरे जावे लागत आहे. यापार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रविवारी औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ओल्या दुष्काळाची पाहणी करत त्यांची कैफियत जाणून घेतली. या दौऱ्यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रति हेक्टर मदत द्यावी, अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली. उध्दव ठाकरे यांच्या या दौऱ्यावरून माजी मंत्री तथा शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी जोरदार टीकास्र सोडले.

शिंदे-फडणवीस सरकारने घोषणांची खैरात पण मदत मात्र दिली नाही, या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याबाबत विचारलं असता, रामदास कदम म्हणाले, ज्यांना कावीळ असते, त्यांना सगळी दुनिया पिवळी दिसते, तशी अवस्था आता उद्धव ठाकरेंची झाली आहे. ते मागील अडीच वर्षात मातोश्रीतून कधीही बाहेर पडले नाहीत. केवळ दोन ते तीन वेळा ते मंत्रालयात गेले होते. अडीच वर्षात त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही आणि त्याची अंमलबजावणीही केली नाही अशी टीका केली.

एका वृत्त वाहिनीशी बोलताना रामदास कदम यांनी वरील टीका केली.

कोकणात वादळाचं मोठं संकट आलं होतं. यावेळी लाखों कुटुंबं उद्ध्वस्त झाली होती. या कुटुंबांचं अश्रू पुसण्यासाठी मुख्यमंत्री असताना उध्दव ठाकरे कोकणात गेले नाहीत. इतकं वय असतानादेखील शरद पवारांसारखे नेते मात्र नुकसानग्रस्तांची पाहणी करायला गेले. आदित्य ठाकरेही गेले नाहीत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्याचं पाहून मला आनंद झाला. पण त्यांना शेतीचा किती अभ्यास आहे, हे मला माहीत नाही. पण अजून परतीचा पाऊस पडत आहे. त्यामुळे अद्याप पंचनामे झाले नाहीत. जोपर्यंत पंचनामे होत नाहीत, तोपर्यंत मदत देता येत नाही, याची त्यांना कदाचित कल्पना नसेल. उद्धव ठाकरे केवळ दिखावा करण्यासाठी तिथे गेले, असं मला वाटतं असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

माझं अंत:करणातून एक मागणं आहे. अजित पवारांनी आता विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा आणि ही जबाबदारी उद्धव ठाकरेंनी आपल्या हाती घ्यावी, असं मला आता वाटतं असेही ते म्हणाले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *