Breaking News

अजित पवारांचे आदेश, कृषीपंप व ग्राहकांची वीजजोडणी तोडू नका विरोधकांच्या प्रश्नावर अजित पवार यांची ग्वाही

मुंबईः प्रतिनिधी

सकाळी विधानसभेचे कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वीज मंडळाकडून वीज ग्राहक आणि कृषीपंपधारक शेतकऱ्यांना वीज जोडणी तोडण्यासंदर्भात बजाविण्यात आलेल्या नोटीशीचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोपर्यत निर्णय होत नाही तोपर्यत ग्राहकांची वीज तोडू नका असे आदेश वीज मंडळाच्या विभागाला दिले.

शेतकऱ्यांचे कृषीपंप आणि वीज ग्राहकांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत कुणाचीही वीज जोडणी तोडू नये, असे निर्देशही त्यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधिमंडळातील निर्देशानंतर संबंधित यंत्रणांना वीजतोडणी तात्काळ थांबवण्यास सांगण्यात आले.

वीजबिलांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. चर्चा होऊन दोन्ही बाजूच्या सभासदांचे समाधान होईपर्यंत राज्यातील कृषीपंप आणि ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यात येणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली.

राज्यातील वीज थकबाकी संदर्भात विशेष बैठक आयोजित करुन चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचेही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या निर्देशाबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.

दरम्यान, करोना काळात पाठवण्यात आलेल्या वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यावरून सभागृहात आज गोंधळ उडाला. विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराचा तास तहकूब करून वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर चर्चा घेण्यात यावी, अशी मागणी केली. त्यावरून भाजपा आक्रमक झाली. सभागृहात गोंधळ सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करत वीज तोडणी मोहिमेला स्थगिती देत असल्याची घोषणा केली.

सभागृहाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी भाजपा आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केलं. वाढीव बिलासंदर्भातील फलक झळकावत भाजपानं या मुद्द्याकडे सरकारचं लक्ष वेधून घेतलं. सर्वसामान्य नागरिकांच्या वीज कनेक्शनसह कृषी पंपाची वीज तोडण्याची कारवाई थांबवण्यात यावी, अशी मागणी भाजपानं केली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वाढीव वीज बिलाचा मुद्दा उपस्थित केला.

वाढीव वीज बिल मुद्द्यांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत चर्चा घेण्याची मागणी केली. “राज्यात वीज कनेक्शन कापली जात आहेत. करोनामुळे संकटात आलेल्या नागरिकांना अडचणीत आणलं जात आहे,” असं फडणवीस म्हणाले. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले,”राज्य सरकारच्या वतीने मी सांगू इच्छितो की, जोपर्यंत ऊर्जा विभागाची वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर चर्चा होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचे, सर्वसामान्य नागरिकांचे वीज कनेक्शन तोडणं थांबण्यात येईल. आज राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा आहे. या मुद्द्यावर चर्चा करण्यात यावी, अशी सभागृहातील दोन्ही बाजूंच्या सदस्यांची इच्छा आहे. त्यामुळे एक दिवस ठरवून चर्चा करू. चर्चेतून सगळ्या सदस्यांचं समाधान झाल्यानंतर वीज बिलाच्या मुद्द्यासंबंधातील निर्णय घेण्यात येतील,” असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

अजित पवारांनी वीज कनेक्शन तोडणी थांबवण्याची घोषणा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि सरकारचे आभार मानले. फडणवीस म्हणाले,”अतिशय योग्य निर्णयाची घोषणा केली, त्याबद्दल मी अजित पवार यांचे आभार मानतो. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, जोपर्यंत यासंदर्भात निर्णय होत नाही, तोपर्यंत कुणाचीही वीज तोडण्यात येणार नाही. याबद्दल सरकारचे आभार मानतो. ज्यांची वीज तोडली, त्यांच्या जोडून द्या. त्यांनाही समान न्याय द्या, अशी माझी विनंती आहे,” फडणवीस म्हणाले.

 

 

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात ६२.७१ टक्के मतदान

मागील काही दिवसापासून वातावरणातील उष्मा वाढत आहे. तर दुसऱ्याबाजूला लोकसभा निवडणूकीच्या प्रचारामुळेही राजकिय वातावरण चांगलेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *