Breaking News

फडणवीसांच्या त्या दाव्यावर संजय राऊतांचा खोचक टोला, अजून ते झोपेतून उठले नाहीत… पहाटेच्या शपथविधीबाबत पवारांशी बोलूनच निर्णय फडणवीसांच्या दाव्यावर राऊतांचा पलटवार

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अडीच वर्षापूर्वी पहाटेच्या शपथविधीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची राजकिय खेळी असू शकते असे सांगत पुन्हा एकदा राजकारणात गोंधळ उडवून दिला. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही याबाबत अडीच वर्षापूर्वी घडलेल्या घटनेचा आता काय संबध असे सांगत अधिक बोलण्याचे टाळले. त्या वाक्याचा संदर्भ पकडत नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या शपथविधीवरून पुन्हा एकदा शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात आल्याचे जाहिर वक्तव्य केले. त्यावर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या त्या दाव्यावर म्हणाले, अडीच वर्षांनंतरही देवेंद्र फडणवीस तेच सकाळचे स्वप्न पाहत आहेत. अजूनही ते झोपेतून उठले नाहीत. शपथविधी सोहळा होतोय, ते मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत, असे स्वप्न कधीपर्यंत पाहणार? हे दळण आणखी किती काळ दळत राहणार?, अशा शब्दात खोचक टोला लगावला.

काल एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव घेऊन टीका केली होती. अजित पवार यांच्यासोबतचा शपथविधी शरद पवार यांच्या परवानगीनेच झाला असल्याचा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला होता. त्यावर आज सकाळी माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांनी खोचक टोला लगावला.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, अडीच-तीन वर्ष झाली आता त्या शपथविधीला. शरद पवार यांचा त्यात काहीही संबंध नाही. शरद पवारांनी ते कांड केले असते तर सरकार पाच वर्ष टिकले असते. त्यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा एकही आमदार भाजपाला फोडता आला नाही. भाजपाने सर्वात आधी शिवसेनेशी विश्वासघात केला. त्यावेळी शरद पवार जर तुमच्या षडयंत्रात सामील असते, तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारने पाच वर्ष पूर्ण केली असती. शरद पवार आपल्या शब्दांचे पक्के असून ते हाती घेतलेले काम पूर्ण करतात, असेही भाष्य केले.

शिवसेना-भाजपा युती तुटण्या वरून टीका करताना संजय राऊत म्हणाले, असं काही ठरलं नव्हतं, हे बोलण्याची हिंमत करु नका. असंच ठरलं होतं. हे तुमच्या तोंडून निघालेलं होतं. हॉटेल ब्लू सी मधील तुमचं वक्तव्य तुम्हीच तपासून पाहा. हे एक नंबरचे खोटारडे लोक आहेत. त्यांचा खोटारडेपणा आम्ही रोज उघड करु. जर असं काही ठरलं नव्हतं. तर मग उद्धव ठाकरेंना दिलेला वायदा मिंधे गटाच्या टेस्ट ट्यूब बेबी सोबत का पूर्ण करत आहात. त्यांना का मांडीवर बसवून त्यांचा पाळणा हलवत आहात. आता म्हणत आहात, आम्ही शिवसेनेशी युती केली, मग आम्ही कोण होतो? असा सवालही फडणवीसांना केला.

तसेच फडणवीस यांनी केलेल्या अटक करण्याच्या आरोपाला प्रत्युत्तर संजय राऊत देताना म्हणाले, आमचे सरकार असताना देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते होते. विरोधी पक्षनेत्याला अडचणीत आणणे ही महाविकास आघाडीची परंपरा नाही. मात्र त्यांनी असे काय केले, ज्यामुळे त्यांना अटक होण्याची भीती सतावत होती. देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या काही अधिकाऱ्यांनी मविआच्या नेत्यांचे फोन टॅप केले होते. उद्धव ठाकरे, नाना पटोले, अजित पवार, संजय राऊत, सुप्रिया सुळे यांचा फोन टॅप करुन ते सर्व ऐकत होते. हा गंभीर गुन्हा आहे. मविआ सरकार या प्रकरणाचा तपास करत होती. मात्र तेवढ्यात सरकार बदलले. फडणवीस सत्तेत आल्यानंतर आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात आले. या प्रकरणाचा तपास तुम्ही का होऊ दिला नाही. तुम्ही पाप केलंय, म्हणूनच तुम्ही घाबरत आहात असा पलटवारही केला.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *