Breaking News

देवेंद्र फडणवीस म्हणाले, औद्योगिक विकासासाठी उत्तम शैक्षणिक व्यवस्था निर्माणाची गरज चीन मधले उद्योग भारतात येण्याची शक्यता

देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलरकडे नेत असताना देशातील औद्योगिक विकासासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि त्यासाठीची उत्तम शैक्षणिक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

भारती विद्यापीठ परिसरात उभारण्यात आलेल्या भारती सुपर स्पेशिआलिटी हॉस्पिटल आणि विद्यार्थी वसतीगृह संकुलाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू, सीरम इन्स्टिट्यूटचे अदार पुनावाला, खासदार संजयकाका पाटील, आमदार विश्वजीत कदम, विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ.विवेक सावजी, भारती विद्यापीठ हेल्थ सायन्सेसच्या कार्यकारी संचालक डॉ.अस्मिता जगताप आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज चीनमधून उद्योग बाहेर पडत असताना हे उद्योग भारतात येण्याची सर्वाधिक शक्यता आहे. मात्र, अशा उद्योगांना आकर्षित करण्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार करावे लागेल, त्यासाठी त्याप्रकारचे शिक्षण द्यावे लागले. त्यादृष्टीने भारती विद्यापीठासारख्या संस्थांना महत्व आहे.

देशाच्या विकासात स्टार्टअपची भूमिका महत्वाची

भारतीय युवकांनी तंत्रज्ञान युगात आपली क्षमता दाखवून दिली आहे. भारत आणि महाराष्ट्रातही अनेक स्टार्टअप तयार होत आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होत आहे. तंत्रज्ञानाच्या विकासाने ही परिस्थिती निर्माण केली आहे. या वेळेचा उपयोग आपण केला तर आपल्या देशाला विकसित राष्ट्र म्हणून ओळख प्रस्थापित करता येईल. या अमृतकाळात पुढील २५ वर्ष आपल्यासाठी महत्वाचे आहेत. यात चांगली शैक्षणिक व्यवस्था निर्माण केली तरच आपण आपल्या देशाला प्रगतीकडे नेऊ शकतो.

औद्योगिक विकासासाठी उत्तम शिक्षण आवश्यक

आज तंत्रज्ञान क्षेत्रात आपण पुढे जात आहोत. संरक्षण उत्पादनात आपण आयात करणारे होतो. मात्र आज अनुकूल व्यवस्था निर्माण केल्याने आपण संरक्षण उत्पादने निर्यात करू शकतो. पुण्यातील औद्योगिक प्रगती येथील शैक्षणिक विकासामुळे झाली. कुशल मनुष्यबळ उपलब्ध असल्याने पुणे, राज्याचे उत्पादनाचे केंद्र आणि उद्योगांसाठी आकर्षण होऊ शकले. भारती विद्यापीठासारख्या विद्यापीठाने मनुष्यबळ विकासाचे मोठे कार्य केले.

भारती विद्यापीठाने विदेशासारखे शैक्षणिक परिसर निर्माण केले. एक मिशन म्हणून त्यांनी हे काम हातात घेवून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य केले. भारती विद्यापीठाने विदर्भातही असा शैक्षणिक परिसर निर्माण करावा. मराठवाडा आणि विदर्भात अशी शिक्षण व्यवस्था निर्माण झाल्यास महाराष्ट्र देशाच्या विकासात मोठे योगदान देणारे राज्य ठरेल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

स्व.पतंगराव कदम यांच्यात प्रेम आणि जिव्हाळा निर्माण करण्याची ताकद

स्व.पतंगराव कदम यांच्याकडे पाहिल्यावर आश्वासकता वाटायची. त्यांच्यात प्रेम आणि जिव्हाळा निर्माण करण्याची ताकद होती. शून्यातून विश्व निर्माण करणारा नेता म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख आहे. म्हणून १९० पेक्षा अधिक संस्था भारती विद्यापीठांतर्गत दिसून येतात. केवळ उच्च शिक्षण नाही तर गुणवत्तापूर्व शिक्षण देण्याचे कार्य त्या माध्यमातून होते आहे, असेही फडणवीस म्हणाले.

अदार पुनावाला यांना या पुरस्काराच्या माध्यमातून देशातर्फे धन्यवाद देण्याचे काम झाले आहे. जगाला भारताची ताकद दाखविण्याचे कार्य सीरम इन्स्टिट्यूटने केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातच लस निर्मितीचा निर्धार केला आणि देशाच्या कानाकोपऱ्यात ही लस पोहोचली. म्हणून सीरमसारख्या संस्थेचा अभिमान वाटतो. स्व.पतंगराव कदम यांच्या नावाचा अर्थात शून्यातून विश्व उभारणाऱ्याच्या नावाचा पुरस्कार शून्यातून विश्वाला वाचविण्याचे कार्य करणाऱ्याला दिला ही महत्वाची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *