Breaking News

शरद पवार म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता नव्या क्षेत्रातील परिवर्तनाची दिशा भारती विद्यापीठ देईल

आरोग्य विषयक नव्या सुविधा निर्माण करताना वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. भारती विद्यापीठासारख्या संस्था हे करू शकतील. जगात नवनवे संशोधन होत आहे, बदल होत आहेत, नवे तंत्रज्ञान निर्माण होत आहे. कृत्रीम बुद्धीमत्तेचा आधार घेऊन समृद्ध पिढी घडविण्याचा प्रयत्न होत आहे. संशोधनात लक्ष केंद्रीत करून देशासमोरचे प्रश्न सोडविण्याला हातभार लावावा. या नव्या क्षेत्रातील परिवर्तनाची दिशा भारती विद्यापीठ देशाला देईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला.

भारती विद्यापीठ परिसरात उभारण्यात आलेल्या भारती सुपर स्पेशिआलिटी हॉस्पिटल आणि विद्यार्थी वसतीगृह संकुलाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू, सीरम इन्स्टिट्यूटचे अदार पुनावाला, खासदार संजयकाका पाटील, आमदार विश्वजीत कदम, विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ.विवेक सावजी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना शरद पवार पुढे म्हणाले, स्व.पतंगराव कदम यांनी शून्यातून हे विश्व निर्माण केले. शैक्षणिक क्षेत्रात द्रष्टे म्हणून त्यांची ओळख होती. राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा प्रश्न असलेल्या पाणी प्रश्नाचे जाणकार म्हणून त्यांचे नाव घ्यावे लागेल. रयत शिक्षण संस्थेशी असलेली बांधिलकी त्यांनी कधी सोडली नाही. त्यांच्या नावाचा पुरस्कार अदार पुनावाला यांना देण्यात आल्याचा आनंद आहे.

जगात १६० देशात जन्माला येणाऱ्या प्रत्येक १०० मुलांपैकी ५० मुले सीरमची लस वापरतात. महाराष्ट्र आणि देशासाठी ही अभिमानाची बाब आहे. सामाजिक भान ठेवून अदार पुनावाला यांनी वडिलांचा वारसा पुढे सुरू ठेवला आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पुणे महानगरपालिकेला १५० पेक्षा अधिक वाहने दिली आहेत. मानवाचे प्रश्न सोडविण्याचे काम करताना समाजाला मदत करण्याचे कार्य ते करत असतात असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू म्हणाले, स्व.पतंगराव कदम यांनी विशेष उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन भारती विद्यापीठाची स्थापना केली. त्यामुळे आज ही संस्था विविध विद्याशाखांमध्ये प्रगती करीत आहे. हिमाचल प्रदेश आज शिक्षण क्षेत्रात अग्रेसर आहे. हिमाचल प्रदेशच्या डॉक्टरांनी देशाच्या वैद्यकीय क्षेत्रात लौकीक मिळविला आहे.

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पुढे गेल्यास सुधारणा निश्चितपणे करता येते. वैद्यकीय क्षेत्रातदेखील तंत्रज्ञानाचा उपयोग करावा लागेल. हिमाचल प्रदेशने वैद्यकीय क्षेत्रातील सुधारणांसोबत उच्च शिक्षण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना सुरू केल्याचे सुक्खू यांनी सांगितले.
पुनावाला म्हणाले, सिरम इन्स्टीट्यूटच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी भारत आणि जगाची लशीची मागणी पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम केल्याने ७० ते ८० देशांना मदत करता आली. राज्य आणि केंद्र सरकारचेही यात सहकार्य मिळाले. विद्यार्थ्यांचे स्वप्न आणि महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी अनुकूल वातावरण भारतात आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात आमदार कदम म्हणाले, भारती विद्यापीठाच्या स्थापनेच्या ५८ वर्षाच्या काळात ९० हून अधिक शाखा ग्रामीण भागात आहेत. सामाजिक बांधिलकीचा वसा स्व.पतंगराव कदम यांनी घालून दिला आहे. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातही विद्यापीठाने अत्याधुनिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत. कोविड काळात विद्यापीठाच्या रुग्णालयाने रुग्णसेवेचे काम केले. गोरगरिबांच्या सेवेसाठी नूतन सुपर स्पेशिआलिटी हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. संस्थेने मानवता जपण्याचे काम केल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या हस्ते पहिला डॉ. पतंगराव कदम स्मृती पुरस्कार वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबाबत अदार पुनावाला यांना प्रदान करण्यात आला. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार यांनी भारती विद्यापीठ गोल्डन ज्युबिली म्युझियमला भेट दिली.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *