Breaking News

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेत आता पवारांची तिसरी जनरेशन, रोहित पवार अध्यक्ष पदी रोहित पवारांनी मांनले सर्वांचे आभार

मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन या दोन्ही संघटनांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा वरचष्मा आहे. विशेष म्हणजे क्रिकेट या दोन्ही संघटनावर प्रमुख पदाधिकारी अथवा सदस्य कोण असावेत आणि नसावेत याचा बहुतांष निर्णय शरद पवार हेच घेत असल्याची चर्चा सातत्याने या दोन्ही असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांमध्ये होत असते. परंतु आता या संघटनेवर मोठ्या पवारांनंतर कोण अशी चर्चा केली जात असतानाच पवार कुटुंबियातील रोहित पवार यांची निवड करण्यात आली आहे. रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या सदस्य पदी आणि अध्यक्ष पदी आज निवड करण्यात आली. अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणूकीत रोहित पवार यांचा विजय झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दोन नातवांमध्ये महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत आ. रोहित पवार यांनी पहिल्याच प्रयत्नात बाजी मारली. त्यामुळे मुंबई क्रिकेट संघटनेपाठोपाठ महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीतही राजकारणाचा विजय झाल्याचे स्पष्ट झाले. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची सूत्रे राजकीय व्यक्तीच्या हाती जाण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कार्यकाल संपलेल्या पदाधिकाऱ्यांना या निवडणुकीसाठी लांब राहावे लागणार होते. सत्तारुढ गटाचे सर्वच उमेदवार यामुळे बाहेर जाणार होते. त्यामुळेच सत्तारुढ गटाकडून रोहित पवार यांचे नाव पुढे करण्यात आले होते. अधिकृत घटनेच्या वादात गेली दोन वर्षे अडकलेल्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या निवडणूकीत बाजी मारण्यासाठी रोहित पवार यांना पुढे करण्याचा निर्णय चांगलाच यशस्वी ठरला.

संघटनेवर खेळाडूंना प्राधान्य देण्याच्या बाबतीत महाराष्ट्र क्रिकेट संघटना देखील मागे राहिली. महाराष्ट्राचा माजी कर्णधार शंतनु सुगवेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. मात्र, त्याला फारशी साथ मिळाली नाही. निवडणूकीपूर्वी पडद्यामागे रंगलेल्या नाट्यात क्रिकेटचा पराभव झाला हेच या निवडणूकीच्या निकालावरून स्पष्ट झाले. निवडणुकीत रोहित पवारांनी एकतर्फी बाजी मारली. शंतनु सुगवेकर आणि घटनादुरुस्तीसाठी पाठपुरावा करणारे अभिषेक बोके दोघेही रोहित पवारांपासून खूप दूर राहिले.

या निवडणूकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणापासून क्रीडा क्षेत्रातही आपले निर्विवाद वर्चस्व राखणारे शरद पवार यांचे दोन नातू या निवडणूकीच्या रिंगणात होते. रोहित पवार आणि शरद पवारांचे भाचे जावई विक्रम बोके यांचा मुलगा अभिषेक हे या वेळी एकमेकांविरुद्ध उभे होते. मात्र, अभिषेक बोके या निवडणूकीत फारच फिके पडले. सर्वात महत्वाचे म्हणजे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची यापूर्वीची निवडणूक बेकायदेशी असल्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्यासंदर्भात लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचे समजते. पण, या निकालापूर्वीच नवी निवडणूक देखील पार पडली.

दरम्यान, निवडणूकीत बाजी मारल्यानंतर रोहित पवार यांनी सर्व सदस्य आणि आजी-माजी अध्यक्षांचे आभार मानत आपण क्रिकेटच्या खेळाडूंसाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहिर केले.

Check Also

श्रद्धा वालकर घटनेची मुंबईत पुनरावृत्ती! निजामने केली पुनमची निघृण हत्या

मानखुर्द येथील साठेनगर परिसरात राहणाऱ्या पूनम क्षीरसागर नामक मातंग समाजातील तरुणीचा मृतदेह तुकडे करून एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *