Breaking News

देवेंद्र फडणवीस म्हणाले, हिंदुत्व विचारासाठी सत्ता परिवर्तन, पण… भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत प्रतिपादन

हिंदुत्व विचाराच्या रक्षणासाठी राज्यात सत्ता परिवर्तन झाले असून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार भाजपा बरोबर आले आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पनवेल येथे भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या समारोप प्रसंगी करत ते पुढे म्हणाले, जरी सरकार राज्यात आलेले असले तरी सर्वांच्याच अपेक्षा पूर्ण होतील असे नाही. अनेकांना त्याग करावा लागणार असून येणाऱ्या काळात पूर्ण बहुमताने राज्यात सरकार आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील असा सूचक इशाराही पक्षातंर्गत इच्छुकांना दिला.

विधान परिषदेच्या १२ जागा रिक्त आहेत. मात्र त्यासाठी १२०० जणांनी अर्ज माझ्याकडे आणून दिले आहेत. त्यामुळे सगळ्यांना न्याय मिळेल असे नाही. त्याचबरोबर आपल्या पक्षातही अनेक ज्येष्ठ आमदार, नेते आहेत. परंतु त्या सर्वांनाच मंत्रीपद मिळेल असेही नाही. काही मंत्रीपदे आपल्याला मिळतील तर काही मंत्रीपदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्यांनाही द्यावी लागणार आहेत. तरीही आपणाला आगामी काळात महापालिका आपल्या पक्षाच्या ताब्यात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार असल्याचेही ते म्हणाले.  महाविकास आघाडी सरकारच्या काळात निर्माण झालेला विकासाचा अनुशेष त्वरेने पूर्ण करून महाराष्ट्राला देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, प्रदेश प्रभारी सी.टी.रवी, सह प्रभारी ओमप्रकाश धुर्वे व जयभान पवैय्या, राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेश सरचिटणीस आ. श्रीकांत  भारतीय आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

फक्त सत्तेसाठी विचारधारा सोडणाऱ्या पक्षांची अवस्था आपण पाहिलेली आहे. ज्या पक्षात एकाधिकारशाही आणि घराणेशाही निर्माण होते त्या पक्षांची अवस्था आपण पहात असल्याचा टोलाही त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी यावेळी लगावला.

विधानसभा निवडणूकीचे निकाल जाहिर होण्याआधीच त्यांनी आमचे सर्व पर्याय खुले असल्याचे जाहिर केले. त्यावेळी त्यांचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आधीच ठरले होते. त्यामुळे फक्त ते आकड्यांचे गणित जुळतेय का? ते पहात होते. तिघांच्या आकड्याचा मेळ बसतोय हे लक्षात आल्याबरोबर त्यांनी महाविकास आघाडी स्थापन केली. अन् त्यावेळी मी त्यांना फोन करत होतो. पण ते फोन घेतच नव्हते असेही त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकारने विकासाला प्राधान्य देण्याऐवजी सूडबुद्धीचा कारभार सुरू केला. पहिले काही महिने तर ते याला स्थगिती, त्याला स्थगिती, त्याची चौकशी असले प्रकार सुरु केले. तसेच अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांची छळवणूक केली गेली. या परिस्थितीतही कार्यकर्ते ठामपणे उभे राहिले. महाविकास आघाडी सरकारने वारंवार हिंदुत्ववादी विचारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करायचा आणि दाऊदच्या विचारांचा बचाव करायचा असे  प्रकार सहन न झाल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करतो असेही ते म्हणाले.

यावेळी कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्यावर बोला अशी मागणी करता ते म्हणाले की, त्यांची तर हे सरकार येण्यामध्ये मोठी मदत झाल्याचा टोला लगावत पुढे म्हणाले ते रोज सकाळी बोलत होते. त्यांच्या बोलण्याला शिवसेनेतील आमदार आणि खासदार वैतागले. त्यामुळे त्यांचा रोजचा सकाळचा कार्यक्रम बंद पाडण्यासाठीच त्यांनी तेथून निघून आपल्या सोबत आल्याचे त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकार सत्तेतून गेल्याने जनतेने आता मोकळा श्वास घेतला आहे. आमचे हिंदुत्व व्यापक आहे. आम्ही कोणाचेही लांगुलचालन करणार नाही, सर्वांना समान न्याय देऊ. भाजपा नेतृत्वाने कधीही अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला नव्हता. फक्त सत्तेसाठी त्यांनी जनादेशाचा अपमान केला. कारण काँग्रेस -राष्ट्रवादी बरोबर जायचे त्यांनी आधीच ठरवले होते असेही ते म्हणाले.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी चालवत आहेत. हीच खरी शिवसेना आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवून मी सरकारबाहेर राहून पक्षाचे कार्य करण्याचे ठरवले होते. परंतु पक्षाने मला सरकारमध्ये सहभागी होण्याचा आदेश दिला. मी तो पाळला. पक्षाचा आदेश माझ्यासाठी सर्वोच्च आहे. पक्षाने दिलेला आदेश पाळणे हा माझ्या दृष्टीने कृतकृत्यतेचा क्षण होता, असेही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.

राजकीय इच्छाशक्ती नसल्याने महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण घालवले. आम्ही तातडीने आवश्यक कार्यवाही करून हे आरक्षण परत मिळवले. मराठा आरक्षण विषयही आम्ही मार्गी लावू. विकासाचा कार्यक्रम धडाक्याने राबवू. नव्या सरकारने सत्तेत आल्या आल्या अनेक निर्णय घेतले. पेट्रोल, डिझेल स्वस्त केले.औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद चे धाराशिव असे नामांतर केले, नवी मुंबई विमानतळाला दि .बा. पाटील यांचे नाव दिले, स्वच्छ महाराष्ट्र अभियान साठी १२ हजार कोटींची तरतूद केली, गणेशोत्सव, दहीहंडी वरील निर्बंध उठवले, समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी निविदा काढली गेली, आरे कारशेड वरील बंदी उठवली, वारकऱ्यांना टोल माफी दिल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

परराष्ट्र मंत्रालयाची तीव्र नाराजी, अमेरिकेचा मानवी हक्क अहवाल हा पक्षपाती

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी म्हटले आहे की यूएस स्टेट डिपार्टमेंटने जारी केलेला मानवी हक्क अहवाल “खूप …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *