Breaking News

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शहरांबद्दल आस्था ठेऊन शहर “विकासा”वर छाप सोडावी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नगरविकास दिन साजरा

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून आमच्या सरकारने विकासाच्या विविध प्रकल्पांना दिलेली गती लक्षात घेता नागरिकांच्या सोईचा महाराष्ट्र घडविण्याची वाटचाल सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शहरांबद्दल आस्था, जिव्हाळा ठेऊन काम करावे आणि आपल्या कारकीर्दीची छाप शहर विकासावर सोडावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील महापालिका आयुक्त, नगरपालिका, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी यांना केले.

एनसीपीएच्या सभागृहात नगरविकास दिनानिमित्त झालेल्या सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव सोनिया सेठी यावेळी उपस्थित होते.

पुरस्कारांच्या रकमेत भरघोस वाढ

मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, राज्यात नागरीकरण वेगाने होत आहे. त्यासाठी मुलभूत सोयीसुविधा पुरविण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर आहे. विविध योजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून वाढत्या नागरिकीकरणाला सोयी देण्याचा प्रयत्न होत आहे. यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. यंदा नगरविकास विभागाने घेतलेल्या स्पर्तील विजेत्या महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदांना देण्यात आलेल्या विविध पुरस्कारांच्या रकमेत भरघोस वाढ करण्यात आली आहे. त्याच उपयोग शहराच्या सुशोभीकरणासाठी योग्य पद्धतीने करावा. शहरांची स्वच्छता करताना लोकसहभाग वाढवा, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त

नागरिकांना स्थानिक स्वराज्य संस्थांकडून देण्यात येणाऱ्या सेवा गतिमान, दर्जेदार तसेच पारदर्शक पद्धतीने देण्यात याव्यात. प्रशासन लोकाभिमुख व्हावे यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काम करावे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी करांची वसुली १०० टक्के होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. ज्या शहरासाठी आपली नियुक्ती झाली त्याचं आपण देणे लागतो या भावनेतून अधिकाऱ्यांनी काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. नगरविकास विभागाने केंद्र शासनाकडे पाठविलेल्या १५ हजार कोटींच्या प्रस्तावाला मंजूरी दिली. डबल इंजिन सरकार असल्याने त्याचा फायदा होतो, असे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, पुढील दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.

विकासाचे निर्णय कागदावर न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी

शहरे सुशोभित करताना तेथील इतिहास, संस्कृती यांचे दर्शन घडावे अशा पद्धतीने कामे करा. ज्या प्रगत महापालिका आहे त्यांनी अन्य नगरपालिका, नगरपरिषदा यांना मार्गदर्शन करावे जेणेकरून महानगरांप्रमाणे छोटी शहरे देखील विविध विकास कामे आपल्या भागात राबवतील. विकासाचे निर्णय कागदावर न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

शहरांमधील बदल दृष्यस्वरूपात जाणवले पाहिजे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली आहे. शहरांचा विकास करताना कल्पकता आणि अंमलबजावणी यांचा समन्वय योग्य प्रमाणात झाला पाहिजे. विकासकामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्था या सेवा देणाऱ्या आहेत. शहरांमधील बदल दृष्यस्वरूपात जाणवले पाहिजे. अधिकाऱ्यांनी काम करताना आपल्या कारकीर्दीचा ठसा शहर विकासावर उमटवला जाईल, अशी कामगिरी करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

पंतप्रधान आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, अमृत योजना अशा अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण शहराचा कायापालट होत आहे. विकास आराखड्यामध्ये सुधारणा होत आहे विकास आराखडे वेगाने तयार करण्याचे काम सुरू आहे, ज्यामध्ये घनकचरा पिण्याचे पाण्याची व्यवस्था वेगवेगळ्या पायाभूत सुविधा तयार केल्या जात आहेत. त्यासाठी निधीची कमतरता नाही, असेही त्यांनी सांगितले.

झपाट्याने नागरिकरण झालेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख असून त्यामुळे नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा या जलदगतीने आणि गुणवत्तापूर्ण दिल्या जाव्यात. योजनांची अंमलबजावणी पारदर्शकपणे करा, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा २०२२ चा निकाल

शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा २०२२ चा निकाल यावेळी घोषित करण्यात आला. यामध्ये नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे सहा वेगवेगळ्या गटात विभागणी करण्यात आली असून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेस अनुक्रमे १५ कोटी, १० कोटी व ५ कोटी या प्रमाणे पारितोषिक देण्यात आले. “अ” व” ब” वर्ग महानगरपालिका गटामध्ये नागपूर महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. “क” वर्ग महानगरपालिका गटामध्ये नवी मुंबई महानगरपालिका, कल्याण -डोंबिवली महानगरपालिका व छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. “ड” वर्ग महानगरपालिका गटामध्ये पनवेल महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका व अहमदनगर महानगरपालिका यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.

“अ” व” ब” वर्ग नगरपरिषद गटामध्ये शिरपूर-वरवाडे नगरपरिषद, उमरखेड नगरपरिषद व हिंगोली नगरपरिषद यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.”क” वर्ग नगरपरिषद गटामध्ये वेंगुर्ला नगरपरिषद व महाबळेश्वर नगरपरिषद यांना अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात येऊन तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पवनी नगरपरिषद व सोनपेठ नगरपरिषद यांना देण्यात आले. नगरपंचायत गटामध्ये मौदा नगरपंचायत व देवरुख नगरपंचायत यांना अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात येऊन तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देवळा (नाशिक) नगरपंचायत व बाभुळगाव नगरपंचायत यांना देण्यात आले.

राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामगिरीची तपासणी व मूल्यमापन करण्यात आले. यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एकूण ५ गटातील प्रत्येकी ३ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाना उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रशस्तीपत्र देऊन गौरवान्वित करण्यात आले.
यामध्ये “अ”, “ब” व “क” वर्ग महानगरपालिका गटामध्ये नाशिक महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका व पुणे महानगरपालिका यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी प्रशस्तीपत्र देऊन गौरवान्वित करण्यात आले. “ड” वर्ग महानगरपालिका गटामध्ये इचलकरंजी महानगरपालिका, मीरा-भाईंदर महानगरपालिका व कोल्हापूर महानगरपालिका यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी प्रशस्तीपत्र देऊन गौरवान्वित करण्यात आले.

“अ” व” ब” वर्ग नगरपरिषद गटामध्ये शिरपूर-वरवाडे नगरपरिषद, हिंगोली नगरपरिषद व बुलढाणा नगरपरिषद यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी प्रशस्तीपत्र देऊन गौरवान्वित करण्यात आले. “क” वर्ग नगरपरिषद गटामध्ये सोनपेठ नगरपरिषद, नळदुर्ग नगरपरिषद व पाढंरकवडा नगरपरिषद यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी प्रशस्तीपत्र देऊन गौरवान्वित करण्यात आले. नगरपंचायत गटामध्ये कणकवली नगरपंचायत लोहारा नगरपंचायत, कोरची बुद्रुक नगरपंचायत व यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी प्रशस्तीपत्र देऊन गौरवान्वित करण्यात आले. नगररचना विभाग, मंत्रालयीन नगरविकास विभाग यामधील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत माहिती, शिक्षण व संवाद घटकाच्या जिंगल व फिल्मचा शुभारंभ, DAY-NULM लोगो, फिल्म, पुस्तिका व नगर विकास विभागाने राबविलेल्या विशेष कार्यक्रमांबाबत कॉफी टेबल बुकचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात राज्यगीताने झाली. प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी प्रास्ताविक केले. नगरपालिका संचालनालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांनी आभार मानले.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *