Breaking News

भंडारा शहरातही धावणार मेट्रो

भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द (ता. पवनी) राष्ट्रीय सिंचन प्रकल्पामुळे बाधीत होणाऱ्या भंडारा विधानसभा क्षेत्रातील २६ गावांच्या पुनर्वसनाबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या गावांच्या पुनर्वसनाच्या मागणीबाबत बैठक झाली. बैठकीस आमदार नरेंद्र भोंडेकर, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम, यांच्यासह विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, लाभ क्षेत्र विकास मंडळ आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

गोसीखुर्द प्रकल्पामुळे भंडारा जिल्हातील ३४ गावे पुर्णतः व ७० गावे अंशतः गावठाण बाधित होतात. परंतू या व्यतिरिक्त वैनगंगा नदीच्या काठावरील उंचावर वसलेल्या अशा २६ गावठाणातील गावांना गोसीखुर्द जलाशयाच्या वाढणा-या जलपातळीमुळे जोखीम पत्करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा २६ गावांनी सुरक्षितता व आरोग्याच्या दृष्टीने पुनर्वसनाची मागणी केली होती. त्यावर या बैठकीत चर्चा झाली.

या गावांच्या पुनवर्सनाबाबत नुकत्याच तयार करण्यात आलेल्या नव्या पुनर्वसन धोरणानुसार निर्णय घेण्यात यावा. त्यासाठी संबंधित गावातील नागरिकांना विश्वासात घेऊन, तसेच त्यांना पुनर्वसनाबाबतच्या उपाययोजनांची माहिती द्यावी. जिल्हाधिकारी कार्यालयाने या गावांचे ठराव व त्या अनुषंगाने प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागास सादर करावेत असे निर्देशही देण्यात आले.

भंडारा रोड ते भंडारा शहर पर्यंत मेट्रो रेल्वे सुरू करण्यास तत्वत: मान्यता- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भंडारा रोड ते भंडारा शहर पर्यंत मेट्रो रेल्वे सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली. यासंदर्भात महारेल मार्फत रेल्वे आणि राज्य सरकार यांच्या ५०-५० टक्के आर्थिक सहभागासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

भंडारा रोड ते भंडारा शहर पर्यंत मेट्रो रेल्वे सुरू करण्यासंदर्भात आज मंत्रालयात आढावा बैठक झाली. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल आदी उपस्थित होते.

महारेल व्यवस्थापकीय संचालकांनी भंडारा रोड ते भंडारा शहर यादरम्यान अस्तित्वातील ११ कि.मी. लांबीच्या रेल्वे मार्गिकेवर नवी ब्रॉड गेज मेट्रो लाईन प्रकल्पाचा व्यवहार्यता अभ्यास अहवाल (Feasibility Study Report) सादर केला आहे.

नागपूर मेट्रो मार्गिकेला उपमार्ग सेवेने (फिडर सर्विस जोडण्याच्या अनुषंगाने नागपूर शहर व परिसरातील भारतीय रेल्वेच्या मार्गावर सध्या अस्तित्वात असलेल्या पॅसेंजर ट्रेन्स ऐवजी रेल्वे आधारित आधुनिक प्रकारच्या वातानकूलित बी. जी. (Broad Gauge) मेट्रो ट्रेन्स सुरू करण्याच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे.

हा प्रकल्प नागपूर ते भंडारा रोड या भारतीय रेल्वे मार्गिकेवर राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये ११ स्थानके असून त्याची लांबी ६२.७ किमी आहे. भंडारा रोड ते भंडारा शहर नवी ब्रॉड गेज मेट्रो लाईन प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल महारेलने केला आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *