Breaking News

अखेर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांचा राजीनामा नवज्योत सिंग सिध्दू यांची सरशी

पंजाब-मुंबई: प्रतिनिधी

मागील काही महिन्यापासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यात संघर्ष विकोपाला गेला होता. तसेच पंजाबमधील अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्य पध्दतीवर बोट ठेवत हटविण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज सकाळी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले. त्यानुसार कॅप्टन अमररिंदर सिंग हे आपल्या पदाचा राजीनामा देणार असून लवकरच राज्यपालांना भेटून आपला राजीनामा सादर करणार आहेत.

भाजपातून काँग्रेसमध्ये आलेले क्रिकेटपटू तथा माजी खासदार नवज्योत सिंग सिध्दू यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर राज्यात पक्षांतर्गत संघर्षाला सुरुवात झाली. त्यातच सिध्दू आणि अमरिंदर सिंग यांच्यातील संघर्ष टोकाला गेला. सिध्दू यांच्या प्रदेशाध्यक्ष होण्याला अमरिंदर सिंग यांनी आक्षेप घेत त्यांनी सुचविलेल्या व्यक्तीची प्रदेशाध्यक्ष पदी निवड करावीत असा आग्रह काँग्रेस श्रेष्ठींकडे त्यांनी धरला होता. तसेच तेथील निर्माण झालेल्या संघर्षातून मार्ग काढण्यासाठी काँग्रेस श्रेष्ठींकडूनही मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र सिध्दू यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतल्यानंतर अमरिंदर सिंग यांची गच्छंती अटळ मानली जात होती.

सिध्दू यांची पंजाबच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतरही कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांना मानण्यास नकार दिला होता. अखेर काँग्रेस श्रेष्ठींकडून निरोप आल्यानंतर सिध्दू यांच्याबरोबर अमरिंदर सिंग यांनी भेट घेत त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.

त्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेवून राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांना काही काळ दिलासा मिळाला. मात्र अखेर आज सकाळी त्यांना राजीनामा देण्यास काँग्रेस श्रेष्ठींनी राजीनामा देण्यास सांगितल्याचे सांगण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर दुपारपर्यंत ते मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार की नाही याबाबत तर्क-वितर्क लढविण्यात येत होते. मात्र दुपारनंतर अमरिंदर सिंग यांचे सुपुत्र रनींदर सिंग यांनी राजीनामा देत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

त्यानुसार राज्यपालांची भेट घेवून आपल्या पदाचा कॅप्टन अमरिंदर सिंग हे राजीनामा देणार आहेत. आपला पक्षात अवमान झाल्याची खंतही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली. पंजाबमधील या राजकिय लढाईत प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिध्दू यांची सरशी झाल्याचे चित्र सध्या तरी पाह्यला मिळत आहे.

दरम्यान, आगामी विधानसभेला एक ते दिड वर्षे राहीलेले असताना कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पदावरून बाजूला केल्याने त्याचा फटका काँग्रेसला बसणार की नाही याचे उत्तर आगामी काळात मिळणार असले तरी मागील विधानसभा निवडणूकीत सत्ताधारी शिरोमणी अकाली दल आणि भाजपाला चारखाने चीत करत अमरिंदर सिंग यांनी गलितगात्र झालेल्या काँग्रेसला एकहाती सत्ता मिळवून देत पक्षात नवसंजीवनी मिळून देण्याचा प्रयत्न केला होता.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *