Breaking News

भाजपा म्हणते, राष्ट्रवादीने उध्दव ठाकरेंवर जादूटोणा केला… पुन्हा सत्तेवर येण्याचे स्वप्न जयंत पाटील यांनी सोडून द्यावे

राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जादुटोणा केला आणि राज्यात बेईमानीने सत्ता मिळविली. पण आम्ही सावध आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही किमान दोनशे जागा जिंकू. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आता राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सत्तेवर येण्याचे स्वप्न सोडून दिले पाहिजे, असा खोचक टोला भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.

ते सातारा जिल्ह्याचा संघटनात्मक प्रवास करत असून पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, छत्रपती आ. शिवेंद्रराजे भोसले, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील व प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी त्यांनी श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांची भेट घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या टिप्पणीविषयी एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारले असता चंद्रशेखर बावनकुळे यांनी वरील टोला लगावला. उद्धव ठाकरे यांच्यावर जादुटोणा करणारे भोंदूबाबा कोण आहे, असे विचारले असता त्यांनी ते सर्व देशाला आणि महाराष्ट्राला माहिती आहे, असे उत्तर दिले.

एकदा कोणी शरद पवार यांच्या तावडीत सापडले की, सुटत नाही, असेही ते म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस पक्षाचे सर्व काही स्वीकारले आहे. आता फक्त काँग्रेसचे संविधान त्यांनी स्वीकारायचे बाकी आहे. आपल्या पक्षाचे संविधान म्हणून काँग्रेसच्या संविधानाची नक्कल करून निवडणूक आयोगाला सादर करावी, असा टोलाही त्यांनी लगावला.

ते म्हणाले की, प्रतापगडावर अफजलखानाच्या कबरीजवळचे अतिक्रमण हटवावे म्हणून विश्व हिंदू परिषद, शिवप्रतापगड उत्सव समिती, हिंदू एकता आंदोलन अशा अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलने केली. मतांच्या राजकारणासाठी आणि लांगुलचालनामुळे उद्धव ठाकरे सरकारला हे अतिक्रमण काढण्याची हिंमत झाली नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने अतिक्रमण हटविले याबद्दल आपण सरकारचे अभिनंदन करतो.
प्रतापगडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी आपण सरकारला विनंती करू, असेही ते म्हणाले.

सातारा नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना युती असेल व युतीचाच नगराध्यक्ष होईल. भाजपाचे उमेदवार पक्षाच्या चिन्हावर लढतील व विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Check Also

विविध घोटाळ्यांची चौकशी करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

जम्मू-काश्मीरमधील अनेक भरती घोटाळ्यांचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआय (CBI) अधिकाऱ्याचा जम्मूमध्ये अपघाती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *