Breaking News

उध्दव ठाकरे म्हणाले, सीमावर्ती भाग केंद्रशासित करा मराठी भाषिकांच्या पाठीशी सर्वपक्षियांनी खंबीरपणे उभे रहावे !

निपाणी, बेळगाव आणि कारवार असा कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र सीमावाद प्रश्न सर्वोच्च न्यायालयात जोपर्यंत हा विषय प्रलंबित आहे, तोपर्यंत हा प्रदेश केंद्रशासित होण्याविषयी ठराव करायला हवा. सर्व पक्षांनी मराठी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत आज सोमवारी केला.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी पहिल्यादांच विधान परिषदेतील कामकाजात सहभाग नोंदविला. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्‍नाविषयी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून सतत करण्यात येणारे आक्षेपार्ह वक्तव्य आणि सीमा भागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून होत असलेल्या अन्यायाविषयी विधान परिषद प्रस्ताव नियम ९७ अन्वये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात सादर केला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी या चर्चेत भाजपाचे सदस्य प्रवीण दरेकर यांनी भाग घेतला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, सीमा भागातील मराठी आणि महाराष्ट्र यांसाठी आपण एकत्र येण्याची भूमिका घेतली आहे. भाषावार प्रांत रचना होण्याअगोदरपासून मराठी भाषा रूजली आहे. हा वाद २ भाषांचा नाही. मराठी भाषिक म्हणतात आम्हाला महाराष्ट्रात रहायचे आहे. सीमाभागाविषयी आपल्याच सरकारने काही वर्षांपूर्वी एक ‘डॉक्युमेंटरी’ केली आहे. यात सर्व पुराव्यांसह ही सीमाभागाची फिल्म दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना दाखवल्यानंतर सीमाप्रश्‍नाची माहिती उकल होईल. प्रश्‍न केवळ भाषावार प्रांतरचनेचा नाही, तर माणुसकीचा आहे. मराठी माणूस आणि महाराष्ट्र सरकारने कन्नड भाषिकांवर कधीच अत्याचार केले नाहीत. उलट कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांवर अत्याचार करून खोटे गुन्हे नोंद केले.

ते म्हणाले की, या विषयावर किती काळ चर्चा करायची ? आज प्रश्‍न सुटायला पुरक परिस्थिती केंद्र आणि दोन्ही राज्य येथे आहे. तेथे एका पक्षाचे (भाजपाचे) सरकार आहे. आज मुख्यमंत्री दिल्लीऐवजी येथे चर्चेत असणे आवश्यक होते. हा विषय सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर कर्नाटक राज्याने एक एक पाऊल पुढे टाकले. आम्ही मराठी पाट्यांचा कायदा केला, तर लोक न्यायालयात जातात. तिथे कर्नाटकात मराठी पाट्या लावल्या म्हणून राजद्रोहाचे गुन्हे नोंद केले गेले. १ इंच जागा देणार नाही ही कर्नाटकाची कौरवी वृत्ती आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ‘चीन’चे दलाल हा शोध कोणी लावला ? असा खोचक सवालही त्यांनी यावेळी केला.

कर्नाटक विधानसभा बांधते, तसेच बेळगावची उपराजधानी करते. आमचे मुख्यमंत्री त्यावर ‘ब्र’ही काढत नाही. महाराष्ट्रात काही ग्रामपंचायतींनी कर्नाटक राज्यात जाण्याविषयी ठराव केले आहेत. हे लक्षात घेऊन आपण पक्ष बाजूला ठेवून काय कारवाई करणार आहोत ? प्रतिदिनचे व्यवहार कानडी भाषेत करावे लागतात. या विषयावर कर्नाटक राज्यात कुणाचेही सरकार असले, तरी ते एकजुटीने उभे राहतात. आजच कर्नाटक सरकार का पेटले आहे ? महाराष्ट्र एकीकरण समिती फुटत असून त्यांचा आता संयम संपत चालला आहे. कानडी अत्याचार थांबलाच पाहिजे. केंद्रशासित प्रदेश करून केंद्र पालक म्हणून उत्तरदायीपणाने वागेल अशी अपेक्षा आहे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *