Breaking News

ठाकरे गटाचा भाजपाच्या माजी कार्यकर्त्या शुभांगी पाटील यांना पाठिंबा? नाशिक शिक्षक मतदारसंघात तांबे नाट्यानंतर ठाकरे गटाचा निर्णय

विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसने अधिकृत उमेदवारी दिलेली असतानाही विद्यमान आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. उलट आपले सुपुत्र सत्यजीत तांबे यांना अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरायला लावला. त्याचबरोबर भाजपाकडे पाठिंबा मागू असे जाहिर वक्तव्य सत्यजीत तांबे यांनी केले. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्यजीत तांबे यांना काँग्रेसचा पाठिंबा देणार नसल्याचे जाहिर केलेले असतानाच आता शिवसेनेने भाजपाच्या माजी कार्यकर्त्या तथा अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

नाशिकच्या शिक्षक मतदार संघासाठी निर्माण झालेल्या पेचावरून ठाकरे गटाच्या नेत्यांची आज दुपारी उध्दव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीसाठी शुभांगी पाटील या खास मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाल्या होत्या. यावेळी दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ठाकरे गटाने शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांना भाजपा पाठिंबा देण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे मूळच्या भाजपा पक्षातील नेत्या शुभांगी पाटील यांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. परिणामी शुभांगी पाटील यांनी पाठिंबा मिळवण्यासाठी अन्य हालचाली सुरू केल्या आहेत.

याभेटीनंतर शुभांगी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, मला कोणत्याही पक्षाचा ए बी फॉर्म मिळालेला नाही. त्यामुळे मी सध्यातरी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. मी पाठिंब्यासाठी सर्वच पक्षांकडे विनंती करत आहे. माझी सर्वांशी सकारात्मक चर्चा झाली आहे. ठाकरे गटाचे नेते पाठिंब्याबाबत माध्यमांना कळवतील. तसेच मी या निवडणुकीत विजयी होणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून मी पहिली महिला आमदार असेल, असा विश्वासही व्यक्त केला.

ठाकरे गट शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याची शक्यता असताना महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसची याबाबत काय भूमिका असेल, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. तसेच शुभांगी पाटील यांना ठाकरे गट पाठिंबा देत असेल तर भाजपाचा पाठिंबा कोणाला असेल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Check Also

अतुल लोंढे यांचा सवाल, गुजरातला परवानगी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय पाप केले?

कांदा निर्यातबंदी करून मोदी सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला असून कांदा निर्यातबंदी उठवावी अशी मागणी शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *