Breaking News

निवडणूक निकालावर अजित पवारांचा खोचक टोला, त्यांच्यातच जोम आहे? आमच्यात जोम नाही? सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणीच आला नाही..

कसब्यात २८ वर्षांपासूनचा भाजपाचा बालेकिल्ला काँग्रेसनं जिंकला असून चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांच्या रुपाने भाजपानं जागा राखली आहे. या निवडणुकांवरून राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. चिंचवडमध्येही जगताप यांच्याविरोधातील दोन उमेदवारांच्या मतांची बेरीज त्यांच्यापेक्षा जास्त असल्याचं सांगत विरोधकांनी तो भाजपाचा नैतिक पराभव असल्याचा दावा केला. यावरच आज पाथर्डीमध्ये झालेल्या कार्यक्रमात अजित पवारांनी सविस्तरपणे या दोन्ही निकालाबाबत स्पष्ट भूमिका मांडली.

यावेळी कसबा पोटनिवडणुकीविषयी बोलताना अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना म्हणाले, सरकारं बदलत असतात. ताम्रपट घेऊन कुणीच जन्माला आलेलं नाही. आम्ही नाही आणि आत्ताचे बसलेलेही नाही. जनतेच्या मनात येईल तेव्हा जनता बदल करते. शिक्षक-पदवीधरांनी केलेला बदल महाराष्ट्राने पाहिला. कसब्याची निवडणूक तर अशी झोंबली… मग म्हणतात ती निवडणूक हरली, तरी नव्या जोमाने आम्ही जाऊ. आता तुम्ही जोमाने जाणार आणि आम्ही काय बिनजोमाने जाणार आहोत. त्यांच्यातच जोम आहे? आमच्यात जोम नाही? आम्ही तर डबल जोमाने जाऊ, असा उपरोधिक टोलाही लगावला.

कसब्यात बालेकिल्ल्यात २८ वर्षं भाजपाचा आमदार निवडून येत होता. तिथे त्यांचा आमदार पराभूत होतो. महाविकास आघाडी एकत्र ठेवून आपण गेलो, तर नक्कीच बदल होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी बोलताना अजित पवारांनी महाविकास आघाडीतील पक्ष आणि त्यांच्या पदाधिकारी-नेतेमंडळींनाही कानपिचक्या देताना म्हणाले, भांड्याला भांडं लागतं, घरातही लागतं. पण त्याचा आवाज किती निघू द्यायचा हे ज्याच्या त्याच्या हातात आहे. कसब्यातल्या विजयानं आपण हुरळून जायचं कारण नाही. जमिनीवर पाय ठेवूनच लोकांमध्ये काम करत राहायचं अशी सूचनाही केली.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, गेल्या फेब्रुवारीत जिल्हा परिषद, तालुका, पंचायतीच्या निवडणुका होणार होत्या. आम्ही तेव्हा म्हटलं पावसाळा झाल्यावर घेऊ. पण पावसाळा झाला, थंडी संपली, उन्हाळा सुरू झाला तरी हे निवडणुकीचं नाव घेत नाहीत. चिंचवडलाही चांगली लढत झाली. आपल्यातले दोघं उभे राहिले. दोघांनी उमेदवारी मागितली होती. आम्ही एकाला सांगितलं जरा थांब, नंतर तुझा विचार करू. त्या दोघांना मिळालेली मतं भाजपापेक्षा जास्त आहेत. आम्ही प्रयत्न केला. पण सगळ्यांची सांगड घालायला कमी पडलो, अशी कबुलीही दिली.

आगामी निवडणूकांबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, मविआ म्हणून सगळ्यांनी मानसिकता तयार केली पाहिजे. आपण उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे सर्वोच्च नेते निर्णय घेतील त्या पद्धतीने जागा लढवायच्या. अंतर्गत वाद घालून खेळ खंडोबा करू नका. हे पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लावत नाहीत. त्यांना अंदाज येत नहीये की निवडून येतील की नाही. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलतायत.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *